राणी चन्नम्मा विद्यापीठाने दिले तांत्रिक कारण : 27 मार्चपासून होणार प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या बीएड द्वितीय सत्राच्या परीक्षा बुधवार दि. 24 पासून होणार होत्या. परंतु विद्यापीठाने केवळ एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी दुपारी ही परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती जाहीर केली. यामुळे विद्यार्थ्यांत गोंधळ उडाला आहे. अचानक वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चन्नम्मा विद्यापीठाच्या अखत्यारित 45 बीएड कॉलेज आहेत. यामध्ये अंदाजे 4 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दुसऱया सत्राच्या परीक्षा
ऑगस्ट 2020 मध्ये होणार होत्या. परंतु कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला केलेल्या विनंतीनुसार तिसऱया सत्राच्या परीक्षा जानेवारी 2021 च्या अखेरीस घेण्यात आल्या. त्यानंतर आता 24 मार्चपासून द्वितीय सत्राच्या परीक्षांना सुरुवात होणार होती.
27 पासून परीक्षेला होणार सुरुवात
मंगळवारी दुपारी अचानक बदल करण्यात आला. नव्या वेळापत्रकानुसार शनिवार दि. 27 मार्चपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे. परीक्षेच्या आदल्यादिवशी अचानक बदल केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांवर दबाव वाढत असून विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसू लागला आहे.
परगावच्या विद्यार्थ्यांचे हाल
बीएड अभ्यासक्रमासाठी बेळगावसोबतच गोवा व महाराष्ट्रातील विद्यार्थी बेळगावमध्ये येतात. परीक्षा असल्याने चार दिवसांपूर्वीच हे विद्यार्थी बेळगावमध्ये आले आहेत. अचानक वेळापत्रकात बदल झाल्याने त्यांचेही हाल होत आहेत. तीन दिवस परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीसह आर्थिक फटका बसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.