पश्चिम बंगालमधील घटना ः सलग दुसऱया दिवशीच्या प्रकाराने खळबळ
मुर्शिदाबाद / वृत्तसंस्था
बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) जवानाने सहकाऱयाची हत्या करून आपणही आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. पंजाबमधील अमृतसर येथे रविवारी घडलेली घटना ताजी असतानाच सोमवारी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे अशाचप्रकारची घटना उघडकीस आली. सलग दुसऱया दिवशी बीएसएफमध्ये घडलेल्या या प्रकाराने सुरक्षा दलात खळबळ निर्माण झाली आहे.
मुर्शिदाबादमधील कॅम्पमध्ये एका जवानाने सहकाऱयावर गोळी मारल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. त्यानंतर हल्लेखोर जवानाने स्वतःवरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. भारत-बांगलादेश सीमेपासून काही अंतरावर असलेल्या जलांगी येथे 117 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. मृत जवान छत्तीसगड आणि तामिळनाडू येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. काही कारणांवरून वाद झाल्यानंतर दोघांनाही स्थानिक पोलिसांनी पाचारण केले होते. पोलिसांसमोर जाऊन आल्यानंतर काही वेळातच गोळीबाराचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. याप्रकरणी बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस दलाकडून अधिक तपास केला जात आहे.
मुर्शिदाबादमधील घटनेपूर्वी पंजाबमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पमध्ये रविवारी सकाळी गोळीबाराची दुर्दैवी घटना घडली होती. अमृतसर येथील छावणीमध्ये कॉन्स्टेबल दर्जाच्या एका जवानाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात चार जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. सहकाऱयांवर गोळीबार केल्यानंतर साटेप्पा एस. के. या जवानाने स्वतःवरही गोळी झाडत मृत्यूला कवटाळले होते. स्वतःवर गोळी झाडल्यानंतर तो जागीच कोसळला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. डय़ुटी लावण्यावरून झालेल्या वादामुळे ही घटना घडली होती. मात्र, आता याप्रकरणी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहेत.