सन्निधी चषक टी-10 क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन : ओमकार वेर्णेकर, प्रणय शेट्टी, वैभव संघमित्र सामनावीर पुरस्काराचे मानकरी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना मैदानावर नीना क्रिकेट अकादमी आयोजित सन्निधी टी-10 क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लबने आनंद अकादमीचा 59 धावांनी के. आर. शेट्टी संघाने अर्णव स्पोर्ट्सचा 28 धावानी तर युनियन जिमखाना संघाने माळमारूती संघाचा 5 धावांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. ओमकार वेर्णेकर, प्रणय शेट्टी, वैभव संघमित्र यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुरमितसिंग, प्रणय शेट्टी, चंद्रकांत कडोलकर, साकीब सराफ, ताहिर सराफ, केतज कोल्हापुरे, महंमद गौसपीर पाशा आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पुजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 6 बाद 112 धावा केल्या. त्यात ओमकार वेर्णेकरने 2 षटकार 1 चौकारासह 23, विजय पाटीलने 2 चौकारासह 26, आकाश कटांबळेने 2 षटकारासह 18, तर पार्थ पाटीलने 2 षटकारासह 14 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे हर्ष पीने 24 धावात 3 तर ज्ञानेश होनगेकर, विनोद डी. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल आनंद अकादमीचा डाव 8.4 षटकात सर्वबाद 53 धावात आटोपला. त्यात साहील पारिश्वाडने 2 षटकारासह 17 तर विनोदने 12 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे ओमकार वेर्णेकरने 4 धावात 4, शुभम गौंडवाडकरने 8 धावात 4 तर अमर घाळीने 10 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात के. आर. शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 3 बाद 89 धावा केल्या. त्यात स्वप्नील हेळवेने 1 षटकार 3 चौकारासह 35 तर प्रणय शेट्टीने 1 षटकार 4 चौकारासह 30 धावा केल्या. अर्णवतर्फे रघु व जयंत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल अर्णव स्पोर्ट्सने 10 षटकात 6 बाद 61 धावा केल्या. त्यात अमितने 23, तर रवी व जयंत यानी प्रत्येकी 11 धावा केल्या, शेट्टी तर्फे स्वप्नीलने 3 अंगदराज व स्वयं यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. तिसऱया सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 बाद 87 धावा केल्या. त्यात वैष्णव संघमित्रने 34, राहुल नाईकने नाबाद 29 तर रोहित देसाईने 16 धावा केल्या. माळमारूती तर्फे शिवाजी पाटील व सचिन के यांनी प्रत्येकी 2 तर सलमानने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल माळमारूती संघाने 10 षटकात 4 बाद 82 धावा केल्या. त्यात विशाल गौरगोंडाने 24, तर शिवाजी पाटीलने नाबाद 29 धावा केल्या. जिमखानातर्फे वसंत शहापूरकरने 2 तर नासीर पठाणने 1 गडी बाद केला.