बीड/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. काल, शुक्रवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे सांगितले होते. तरीही त्यांचे समर्थक मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर नाराज आहेत. आज मुंडे समर्थकांच्या १४ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
दरम्यान, प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंडे यांना मंत्रिपद मिळावे ही त्यांची इच्छा नव्हती, तर जिल्ह्यातील अठरापगड जातींची ती इच्छा होती, असे त्यांनी म्हंटले आहे.