ऑनलाईन टीम / बीड :
भाजपचे दिगवंत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी स्मृतिदिन आहे. दरवर्षी या दिवशी गोपीनाथ गडावर कार्यक्रम होतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित परळी दौरा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रद्द केला आहे.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मान देऊन पंकजा मुंडे यांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्या आपल्या पोस्ट मध्ये म्हणाल्या की, अगदी मनावर दगड ठेवून मी साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही. मी घरी राहूनच साहेबांना अभिवादन करणार आहे.
दरम्यान, 3 जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी आहे. हा दिवस सर्व समर्थक संघर्ष दिन म्हणून साजरा करतात. त्यानिमित्त बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना प्रवासाची परवानगी दिली होती. मात्र, त्याचबरोबर प्रवास टाळण्याची विनंतीही केली होती. या विनंतीला मान देत पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहून मानवंदना देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, माझी बहीण खा. प्रीतम ताई या वरळी मध्येच आहेत. त्या दिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील, आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन # live करतील. तसेच माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी देखील माझ्या प्रमाणेच घरीच थांबावे आणि माझ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी.