काँग्रेससोबत निवडणूक लढविणार पक्ष
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका बसला आहे. तेथे भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील बोडोलँड पीपल्स प्रंट म्हणजेच बीपीएफने त्यातून काढता पाय घेतला आहे. बीपीएन आता काँग्रेससोबत मिळून निवडणूक लढविणार आहे.
बीपीएफचे नेते हग्रमा मोहिलिरे यांनी समाजमाध्यमांवर भाजप आघाडीतून बाहेर पडल्याची माहिती दिली आहे. आसाममध्ये 27 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान 3 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. निकालाची घोषणा उर्वरित 4 राज्यांसह 2 मे रोजी होणार आहे.
महाजठमध्ये सामील होणार
विकास, शांतता आणि एकतेसाठी स्थिर सरकार आवश्यक आहे. भ्रष्टाचार संपविण्याची आमची इच्छा असल्यानेच बोडोलँड पीपल्स प्रंटने महाजठ (काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी) आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपशी आता आम्ही कुठल्याही प्रकारची मैत्री ठेवू इच्छित नाही. आगामी निवडणूक आम्ही महाजठ आघाडीसोबत मिळून लढणार आहोत असे मोहिलिरे यांनी म्हटले आहे. बीपीएफची स्थापना 2005 साली झाली होती. या पक्षाचा कोक्राझार जिल्हय़ात प्रभाव दिसून येतो. मागील निवडणुकीत या पक्षाने भाजपसोबत आघाडी केली होती. 126 सदस्यीय विधानसभेत या पक्षाने 12 जागांवर विजय मिळविला होता.
मागील वर्षापासून कटुता
भाजप आणि बीपीएफ यांच्या आघाडीत मागील वर्षी कटुता निर्माण झाली होती. बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलच्या निवडणुकीत भाजपने नवा साथीदार निवडला होता. पण सर्वानंद सोनोवाल सरकारमध्ये बीपीएफचे तीन मंत्री आहेत. तसेच बीटीसी निवडणुकीत बीपीएफनेच सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. 40 सदस्यीय या परिषदेत बीपीएफचे 17 सदस्य निवडून आले होते. पण भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी युनायटेड पीपल्स लिबरल पार्टीचे विजयासाठी अभिनंदन केले होते. या पक्षाने 12 जागा जिंकल्या होत्या. शाह यांनी याच पक्षाला स्वतःचा महत्त्वाचा सहकारी संबोधिले होते. फेब्रुवारी महिन्यात आसामचे अर्थमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी भाजप कुठल्याही स्थितीत बीपीएफसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.