90 हजार कोटी रुपयांच्या बोलीचे संकेत
मुंबई
वेदान्ता समूह सरकारी पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (बीपीसीएल) 90 हजार कोटी रुपयांची बोली लावणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये जादाच्या भावावर हा व्यवहार करणार नसल्याची माहिती
आहे. वेदान्ताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी रियाधमध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीच्या दरम्यान याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले, की आम्ही योग्य त्या किमतीतच कंपनीची खरेदी करणार आहे. कंपनीचे समभाग सप्टेंबर 2021 मध्ये 503 रुपयांवर होते. जे सध्या 397 रुपयावर आले आहेत. बाजारमूल्य 85,522 कोटी रुपये आहे. याच आधारावरच वेदान्ता 90 हजार कोटी रुपयांची बोली व्यवहारात लावणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकार भारत पेट्रोलियमच्या विक्रीसाठी प्रयत्न करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये आतापर्यंत यश मिळालेले नाही. सदरची कंपनी ही सलग फायदा देत राहिली आहे. सरकारने आता या मोठय़ा व्यवहारामध्ये पुर्नगुंतवणूक करण्याचा विचार केला आहे. सप्टेंबरमध्ये सरकारने यासाठी अंतिम तारीख निश्चित केली होती. या योजनेत संपूर्ण हिस्सेदारी विकणार होती. बीपीसीएलमध्ये सरकारची हिस्सेदारी हि 52.98 टक्के आहे.
जनतेची हिस्सेदारी
कंपनीमध्ये जनतेची हिस्सेदारी 46.71 टक्के आहे. म्हणजे या आधारे वेदान्ताजवळ अधिकची हिस्सेदारी राहणार असल्याची माहिती आहे. बीपीसीएल देशाची दुसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे.