वृत्तसंस्था/ मुंबई
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे खासगीकरण केले जाणार असून यासंदर्भात आताच अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. खासगीकरणानंतरही स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारी सबसिडी ग्राहकांना यापुढेही नेहमीप्रमाणे मिळणार असल्याची खात्री पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच बोलताना दिली.
ग्राहकांना एलपीजी संदर्भातली सबसिडी थेटपणे दिली जाते. कोणत्याही कंपनीला ती दिली जात नाही. त्यामुळे कंपनीच्या मालकीचा कोणताही परिणाम भविष्यकालीन ग्राहकांच्या व्यवहारांवर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकार प्रत्येक कनेक्शनवर वर्षाला जास्तीत जास्त बारा सिलेंडरची पूर्तता सबसिडीवर करत असते. ही सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये कंपनीकडून जमा केली जाते. ग्राहक विपेत्यांकडून बाजारभावानुसार एलपीजी सिलेंडर खरेदी करत असतात. खरेदीनंतर सबसिडी ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाते. सरकार तेल कंपन्या जशा की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, बीपीसीएल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ग्राहकांना अनुदान देत असते. अनुदान थेट बँकेत जमा होत असल्याने त्याबाबत चिंता न करण्याचे पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.