वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बीपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी जगातील बलाढय़ तेल कंपन्या इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. या कंपनीचे खासगीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना असून ते आतापर्यंतचे सर्वात मोठे खासगीकरण ठरण्याची शक्यता आहे. सध्या या कंपनीच्या विक्रीसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे.
अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या वेदांता समूहाने या स्पर्धेत उडी घेतली आहे. तसेच अपोलो ग्लोबल 1 आणि स्क्वायर्ड कॅपिटल या दोन अमेरिकन वित्तसंस्थांनी गेल्यावर्षीच प्रारंभिक निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. केंद्र सरकारचा या कंपनीत 52.98 टक्के वाटा असून तो सर्वच्या सर्व विकत घेण्याची तयारी या दोन वित्तसंस्थांनी दाखविली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मालमत्ता मूल्यकर्त्यांचा अहवाल येणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. पहिला टप्पा पूर्ण होण्याआधी इतर कंपन्यांनाही बोली लावण्याच्या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.
मध्यपूर्वेतील तेल उत्पादक देशांच्या अनेक कंपन्या, तसेच रशियाची रोसनेफ्ट या कंपनीनेही बीपीसीएलच्या खरेदीत स्वारस्य दाखविले आहे, असे सांगण्यात येते. रॉयल डच शेल, पोलाद सम्राट लक्ष्मीनिवास मित्तल यांचा उद्योगसमूह आदी कंपन्यांनी प्रयत्न चालविले आहेत. तथापि, गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या कंपन्या बोली लावण्यापासून दूर राहिल्याचे दिसून येत आहे.