वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा माजी कसोटीवीर आणि सलामीचा फलंदाज जेफ्री बायकॉटने कोरोना महामारी संकटामुळे बीबीसीच्या समालोचन संघाला निरोप देण्याचा निर्णय घेतला. गेल्या उन्हाळी मोसमाअखेर बॉयकॉटचे बीबीसीबरोबरचा करार संपुष्टात आला होता.
बीबीसीच्या समालोचन संघामध्ये मला आणखी काही दिवस रहावयाचे होते. पण कोरोना महामारी परिस्थितीचा विचार करून मला बीबीसीच्या या समालोचन संघाला निरोप द्यावा लागत आहे.
79 वषीय इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट यांचा बीबीसीच्या समालोचन संघाबरोबर तब्बल 14 वर्षांचा संबंध आला होता. बीबीसीच्या समालोचन संघामध्ये कसोटी सामन्यात ते खास क्रिकेट समालोचक ही भूमिका यशस्वीपणे पार पाडीत होते. पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या कसोटी मालिकेने इंग्लंडमधील कोरोना महामारीमुळे ठप्प झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला पुन्हा प्रारंभ होत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच बॉयकॉट यांनी बीबीसीच्या समालोचन संघातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
तब्बल 14 वर्षांच्या क्रिकेट समालोचन कारकीर्दीमध्ये आपल्याला बीबीसी या वृत्तसंस्थेकडून सर्वतोपरी पाठिंबा मिळाल्याने आपल्याला समालोचक कारकीर्द यशस्वी करता आल्याने बॉयकॉट यांनी बीबीसीच्या क्रीडा विभागाचे आभार मानले आहेत. मध्यंतरी बॉयकॉट यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी काही दिवस विश्रांती घेतली होती.