वृत्तसंस्था/ मुंबई
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांच्या जागेसाठी बीसीसीआयने इच्छुकांकडून अर्जांची मागणी केली आहे. या अकादमीतील 11 प्रशिक्षकांच्या वार्षिक कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यात रमेश पोवार, एस.एस. दास, ऋषीकेश कानेटकर, सुब्रतो बॅनर्जी आणि सुचित सोमसुंदर या भारताच्या निवृत्त क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी, गोलंदाजी (वेगवान आणि फिरकी), क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि हेड ऑफ एज्युकेशन यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एनसीए अध्यक्षपदासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आले आहे. इतर प्रशिक्षक पदासाठी इच्छुकांना 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठविता येतील. या राष्ट्रीय अकादमीमध्ये विविध प्रशिक्षकांसाठी वयोमर्यादा 60 वर्षांची राहील.