अमिरात मंडळाकडून दुजोरा, स्पर्धेच्या तयारीलाही सुरुवात, बीसीसीआय तूर्तास केंद्राच्या प्रतीक्षेत
दुबई / वृत्तसंस्था
2020 आयपीएल स्पर्धा युएईमध्ये भरवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा रीतसर लेखी प्रस्ताव आपल्याला प्राप्त झाला असल्याची माहिती अमिरात क्रिकेट मंडळाने सोमवारी दिली. आयपीएल कार्यकारिणी अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मागील आठवडय़ातच स्पर्धेच्या प्राथमिक तारखांची घोषणा केली. तसेच ही स्पर्धा युएईमध्ये होण्यासाठी आपल्याला केंद्राच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे म्हटले होते.
एकीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ केंद्राच्या प्रतीक्षेत असताना, दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातमध्ये मात्र या स्पर्धेची मागील आठवडय़ात घोषणा झाल्यापासूनच तयारी सुरु झाली आहे. ही स्पर्धा सुरक्षित, संरक्षित वातावरणात आयोजित करता यावी, यासाठी दोन्ही मंडळांच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांची बैठकही पार पडली आहे.
वास्तविक, आठ संघांचा सहभाग असणारी आयपीएल स्पर्धा भरवणे कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे अर्थातच आव्हानात्मक आहे. जागतिक स्तरावर कोव्हिड-19 दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करत असताना आणखी खडतर आव्हाने समोर आहेत. पण, तरीही जैवसुरक्षित वातावरणात स्पर्धा आयोजित करण्यासाठी दोन्ही मंडळे प्रयत्नशील आहेत. शिवाय, या स्पर्धा आयोजनामुळे युएई अर्थव्यवस्थेला देखील घसघशीत लाभ होईल, हे निश्चित आहे.
‘जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या व चित्तथरारक खेळाची अनुभूती देणाऱया गर्भश्रीमंत आयपीएल स्पर्धेच्या यजमानपदामुळे असे अनेक घटक आहेत, ज्यांचा प्रभाव दळवळणासारख्या बऱयाच बाबींवर पडेल’, असे अमिरात क्रिकेट मंडळाचे महासचिव मुबाशीर उस्मानी यांनी पत्रकातून नमूद केले. अबुधाबी, दुबई आणि शारजा क्रिकेट समिती, अबुधाबी, दुबई व शारजा पर्यटन मंडळे आणि पोलीस खाते व युएई आरोग्य व प्रतिबंध खात्याशी संबंधित प्रशासकीय घटक यांच्यातील तज्ञांना लवकरच पाचारण केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
संयुक्त अरब अमिरातला आयपीएल स्पर्धा भरवण्याचा यापूर्वीही एकदा अनुभव आहे. 2014 मध्ये भारतात लोकसभा निवडणुका असल्याने त्या वर्षातील आयपीएलचे काही सामने युएईमध्ये खेळवण्यात आले होते. ‘2014 मधील अनुभव पाठीशी असल्याने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोणाशी सल्लामसलत करावी, कसे नियोजन करावे आणि त्याची कशी अंमलबजावणी करावी, याची आम्हाला उत्तम कल्पना आहे. हीच आमची जमेची बाजू असेल’, असे उस्मानी पुढे म्हणाले.
आयपीएल कार्यकारिणी समिती स्पर्धा आयोजनातील अंतिम बाबी निश्चित करण्यासाठी तसेच संघांना सुचनावली देण्यासाठी लवकरच बैठक घेईल, अशी अपेक्षा आहे. सुदैवाने संयुक्त अरब अमिरातमध्ये कोव्हिड-19 वर बरेच नियंत्रण राहिले असून सध्या तेथे 6 हजारच्या आसपास कोरोना रुग्ण आहेत.
असे आहेत प्रँचायझींचे प्रश्न
स्पर्धेत सहभागी होणाऱया 8 प्रँचायझींना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ स्वतंत्र सुचनावली आखून देणार आहे आणि त्यात प्रँचायझींना काही बाबतीत अधिक स्पष्टता हवी आहे. सर्व प्रँचायझींना आपली स्वतंत्र पथकेही समाविष्ट करुन घ्यावी लागणार असून यामुळे या साऱया ताफ्याला जैव सुरक्षितता प्राप्त करुन द्यावी, ही त्यांची महत्त्वाची अपेक्षा आहे. याशिवायही, खालील मुद्यांवर त्यांना अधिक सुस्पष्टता अपेक्षित आहे.
@खेळाडूंच्या कुटुंबियांना परवानगी देणार का?
यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सहभागी खेळाडूंसमवेत कुटुंबियांना परवानगी देणार का, हा सर्वात कळीचा प्रश्न असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडू जवळपास दोन-अडीच महिने बाहेर असतील. त्यामुळे, त्यांना कुटुंबापासून दूर ठेवणे, हा अपराध ठरेल, असे एका वरिष्ठ प्रँचायझी पदाधिकाऱयाला वाटते. कुटुंबियांना, विशेषतः मुलांना परवानगी दिली तर त्यांची सुरक्षितता जपणे अधिक आव्हानात्मक असणार आहे.
@छोटी हॉटेल्स, रिसॉर्टच्या पर्यायाचा विचार होणार का?
अव्वल दर्जाच्या क्रिकेट संघांना पंचतारांकित हॉटेल्समध्येच राहण्याची सवय असते. पण, सध्याच्या स्थितीत अनेक पंचतारांकित हॉटेल्स भाडे तत्वावर घेणे कठीण स्वरुपाचे असल्याने छोटी हॉटेल्स व रिसॉर्टच्या पर्यायांचा विचार होणार का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मुंबई इंडियन्ससारखे प्रँचायझी आपल्या संघासाठी प्रायवेट जेट तैनात करु शकतात, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची मदत घेऊ शकतात, पंचतारांकित हॉटेलही आरक्षित करु शकतात. मात्र, अन्य काही प्रँचायझींना बीच रिसॉर्टच्या पर्यायावर अधिक विचार करावा लागू शकतो.
@बस ड्रायव्हर, सुरक्षाधिकाऱयांपासून धोका कसा टाळणार?
या स्पर्धेदरम्यान अमिरात क्रिकेट मंडळ स्थानिक वाहतूक सेवा भाडे तत्वावर घेईल. यात संघाला हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत ने-आण करण्याच्या लक्झरी बसेसचा प्राधान्याने समावेश असेल. साधारणपणे अशा बसेसवर स्थानिक ड्रायव्हर असतात. येथे, अशा ड्रायव्हर्सना, सुरक्षारक्षक, सुरक्षा अधिकाऱयांना जैवसुरक्षित वातावरणात राहण्याची सोय केली जाणे अपेक्षित आहे. खेळाडूंना आहार उपलब्ध करुन देणाऱया कॅटरिंग स्टाफसाठीही अशीच सोय करावी लागणार आहे.