खेळाडू उपलब्ध होण्यासाठी सीपीएल लवकर संपवण्याची विनंती करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये आयपीएलचा उर्वरित भाग खेळविला जाणार आहे. मात्र त्यासाठी इतर देशांचे खेळाडू उपलब्ध होण्यात अडचण येत असल्याने त्याच दरम्यान होणारी विंडीजमधील सीपीएल स्पर्धा एक आठवडा किंवा दहा दिवस आधी संपवण्यासाठी बीसीसीआयने विंडीज मंडळाशी बोलणी सुरू केली आहेत.
कोरोना महामारीच्या संकटामुळे 14 वी आयपीएल स्पर्धा अर्ध्यावरच थांबवावी लागली होती. त्याचा उर्वरित भाग यूएईमध्ये खेळविण्यासाठी बीसीसीआयने शनिवारी मान्यता दिली होती. सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत उर्वरित भाग घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान विंडीजमधील सीपीएल स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरू होणार असून त्याचा अंतिम सामना 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. आयपीएल स्पर्धा 18 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याने खेळाडूंना विश्रांतीचा अवधीच मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण होणार आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी विंडीजमधील सीपीएल स्पर्धा ठरलेल्या वेळेच्या आठ दिवस आधी संपविली जावी, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे.
‘आम्ही क्रिकेट वेस्ट इंडीजशी बोलणी सुरू केली आहेत. सीपीएल स्पर्धा आयपीएलच्या काही दिवस आधी संपविली गेली तर सर्व खेळाडूंना बबलमधून बबलमध्ये दुबईत आणणे सोयीचे ठरेल आणि त्यांना तीन दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईनही पूर्ण करता येणार आहे,’ असे या घडामोडीची माहिती असलेल्या बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले. बीसीसीआय व सीडब्ल्यूआय यांच्यातील बोलणी फिसकटल्यास आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत बडे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. दोन्ही टी-20 लीगमध्ये खेळणाऱयांत मुंबई इंडियन्सचा किरन पोलार्ड, अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो, धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल, शिमरॉन हेतमेयर, जेसॉन होल्डर, निकोलस पूरन, फॅबियन ऍलेन, कीमो पॉल, सुनील नरेन आणि त्रिनिदाद व टोबॅगोचे प्रशिक्षक ब्रेन्डॉन मेकॉलम, जे सध्या केकेआरचे प्रशिक्षकही आहेत, यांचा समावेश आहे. सीपीएलची ही नववी आवृत्ती असून जगभरातील बलाढय़ सुपरस्टार्सचा त्यात सहभाग असतो.
आयपीएलचा उर्वरित भाग घेण्यासाठी शनिवारी बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत मंजुरी देण्यात आली. महिन्याभरापूर्वीच बायोबबलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही खेळाडू, प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल स्पर्धा तहकूब करण्यात आली होती.