वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळातर्फे (बीसीसीआय) देशातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणाऱया क्रिकेटपटूंसाठी लेव्हल-2 प्रशिक्षण शिबीर पहिल्यांदाच आयोजित केले आहे. राष्ट्रीय विविध स्पर्धांमध्ये 75 पेक्षा अधिक प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळणाऱया क्रिकेटपटूंना या शिबिरात प्रवेश दिला जाईल. भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एल. बालाजी, रॉबिन उथप्पा आणि विद्यमान निवड समिती सदस्य देबाशीश मोहंती यांचा यामध्ये समावेश आहे.
बीसीसीआयतर्फे यापूर्वी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा ऑनलाईनद्वारे चार दिवसांच्या कालावधीत घेण्यात आला होता. आता या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये 16 ते 19 मार्च दरम्यान आयोजित केला आहे. या शिबिरात माजी क्रिकेटपटू ऋषीकेश कानिटकर, अभिनव मुकुंद, रमेश पोवार, वासीम जाफर, विनयकुमार, शरणदीप सिंग हे सहभागी होत आहेत.