नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बीसीसीआयचे कार्यकारी व्यवस्थापकीय अधिकारी राहुल जोहरी यांचा राजीनामा मंडळाने मंजूर केला असून आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी एक वर्ष आधीच ते पदावरुन पायउतार होतील. या महिन्यात ते आपला कार्यभार सुपूर्द करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2017 मध्ये जोहरी यांची नियुक्ती केली होती. क्रिकेट सल्लागार समिती कार्यरत असताना त्यांच्याकडे सर्वाधिकार होते.
वास्तविक, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली रुजू झाल्यानंतर डिसेंबरमध्येच जोहरी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. प्रारंभी, ते एप्रिलमध्ये पायउतार होणार होते. मात्र, मुदतवाढ देण्यात आली आहे का, हे निश्चित झाले नसल्याने त्यांनी कार्यरत राहण्याचे ठरवले होते. 2017 चॅम्पियन्स चषक स्पर्धा झाल्यानंतर अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला, त्यावेळी जोहरी यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
गांगुली यांनी व्यवस्थापनाची धुरा स्वीकारल्यानंतर जोहरी यांची जबाबदारी बरीच कमी झाली. पुढे बीसीसीआयने व्यवस्थापकीय फेररचना करण्याचा निर्णय घेतला. गांगुली व बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मंडळाच्या सर्व बैठकांना हजेरी दर्शवली असून आयसीसी बैठकांमध्ये तेच बीसीसीआय प्रतिनिधी देखील आहेत.
गांगुली यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देणारे जोहरी हे दुसरे वरिष्ठ अधिकारी ठरले. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये संतोष रांगणेकर यांनी मुख्य वित्तीय अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता.