नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
भारताला दोनवेळा विश्वचषक जिंकून देणारा सर्वात यशस्वी कर्णधार, सर्वात कल्पक यष्टीरक्षक व संघसहकाऱयांकडून अपेक्षित कामगिरी करवून घेण्यात मातब्बर असलेल्या महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयने मध्यवर्ती करारातून वगळत एकच धक्का दिला. गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर धोनी पूर्णपणे संघाबाहेर होता. आता मध्यवर्ती करारातून वगळले गेल्यानंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी आणखी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीकरिता मध्यवर्ती करार केलेल्या खेळाडूंची यादी घोषित केली. धोनीचा यापूर्वी अ श्रेणीत समावेश होता आणि यासाठी त्याला वार्षिक 5 कोटी रुपयांचे मानधन दिले जात होते.
नियमित कर्णधार विराट कोहली, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याचा सहकारी उपकर्णधार रोहित शर्मा व अव्वल गोलंदाज जसप्रित बुमराह यांचा अ+ श्रेणीत समावेश असून त्यांना वर्षाकाठी 7 कोटी रुपयांचे मानधन मिळेल. याशिवाय, आघाडीचा फलंदाज केएल राहुलला ब श्रेणीतून अ श्रेणीत बढती मिळाली आहे.
गतवर्षी 9 जुलै रोजी विश्वचषक उपांत्य लढतीनंतर एकही व्यावसायिक सामना न खेळलेल्या धोनीचा मध्यवर्ती करारात समावेश नसणे फारसे आश्चर्याचे मानले जात नाही. स्वतः त्यानेही आपल्या क्रिकेट भवितव्याविषयी जाहीर वाच्यता करणे टाळले होते. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी लवकरच वनडे क्रिकेट कारकिर्दीचा समारोप करेल, पण, आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन साकारल्यास टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी शर्यतीत असेल, असे यापूर्वी म्हटले होते.
कसोटी सलामीवीर मयांक अगरवालने 2018-19 मधील ऑस्ट्रेलिया दौऱयात पदार्पण केल्यानंतर दमदार कामगिरी साकारली असल्याने त्याचा ब श्रेणीत समावेश आहे. या श्रेणीत हार्दिक पंडय़ा, यजुवेंद्र चहल व अन्य दोघा क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.
वॉशिंग्टन सुंदरचा प्रथमच समावेश
जलद गोलंदाज नवदीप सैनी, टी-20 स्पेशालिस्ट वॉशिंग्टन सुंदर यांचा क श्रेणीत प्रथमच समावेश केला गेला असून यात श्रेयस अय्यर, दीपक चहर व शार्दुल ठाकुर हे क्रिकेटपटू आहेत. धोनीप्रमाणेच निवृत्त अम्बाती रायुडू व दिनेश कार्तिक यांनाही मध्यवर्ती करारातून वगळले गेले आहे. मावळते निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना त्याने लक्षवेधी प्रदर्शन साकारले तरच निवडीसाठी त्याचा विचार होऊ शकते, असे जाहीर केले होते.
दरम्यान, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट भवितव्याविषयी काहीही बोलणे शिताफीने टाळले असले तरी 2020 आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपरकिंग्स संघाचे नेतृत्व साकारणे जवळपास निश्चित आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर धोनीला विंडीज दौरा हुकला असून याशिवाय, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, विंडीज व सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याचा संघात समावेश नाही. भारतीय क्रिकेट वर्तुळातील मातब्बर खेळाडू म्हणून विशेष नावलौकिक प्राप्त करणाऱया धोनीने भारताला 2007 टी-20 विश्वचषक तर 2011 मध्ये मायदेशात वनडे विश्वचषक जिंकून दिला आहे. या अनुभवी खेळाडूने आजवर 90 कसोटी, 350 वनडे व 98 टी-20 सामने खेळले असून त्यात 17 हजारपेक्षा अधिक धावा केल्या, तसेच यष्टीमागे 829 बळी घेतले आहेत.
ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीकरिता बीसीसीआयचे मध्यवर्ती करार केलेले खेळाडू
अ+ श्रेणी (7 कोटी रुपये) : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह.
अ श्रेणी (5 कोटी रुपये): रविचंद्रन अश्विन, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत.
ब श्रेणी (3 कोटी रुपये) : वृद्धिमान साहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंडय़ा, मयांक अगरवाल.
क श्रेणी (1 कोटी रुपये) : केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकुर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.