वृत्तसंस्था/ दुबई
भारतापेक्षा अधिक सुरक्षित भासल्याने यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये स्थलांतरित केली गेली असली तरी तेथेही कोरोनाचे ग्रहण मात्र आयोजकांना अद्याप सोडवता आलेले नाही. बुधवारी बीसीसीआय वैद्यकीय पथकातील एका सदस्याला कोरोना झाल्याचे निदर्शनास आले असून यामुळे हा स्पर्धा आयोजनासाठी आणखी एक धक्का ठरला आहे.
मागील आठवडय़ात चेन्नई सुपरकिंग्स संघातील दीपक चहर व ऋतुराज गायकवाड या 2 खेळाडूंसह एकूण 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर बीसीसीआयचा सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही संख्या 14 वर पोहोचली आहे.
आयपीएल कार्यकारिणीने मागील आठवडय़ात एका वेबिनारचे आयोजन केले. त्या वेबिनारसाठी वैद्यकीय पथकाच्या सहायक गटातील काही सदस्य कार्यरत होते. त्यात या सदस्याचा समावेश होता, असे वृत्त आहे. काही आयपीएल संघांतील पदाधिकाऱयांनी त्या सदस्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्यांना यश आले नाही. सध्याच्या घडीला ती सदस्य उपलब्ध नाही, असे उत्तर त्यांना देण्यात आले.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या सदस्याला स्वतंत्र कक्षेत हलवण्यात आले आहे. यंदाची आयपीएल पूर्वनियोजित रुपरेषेनुसार दि. 19 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. मात्र, अद्याप स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने आयोजकांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.
कोव्हिड-19 च्या महासंकटामुळेच बहुतांशी खेळाडू परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊन सावधगिरीने पाऊल उचलणे पसंत करत आहेत.
रैना यापूर्वीच भारतात परतला आहे तर भारतात असलेल्या हरभजनने युएईला जाणे दोनवेळा लांबणीवर टाकले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हॅझलवूडने कोरोनाचे संकट गंभीर असल्याने आपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे या आठवडय़ात म्हटले आहे. हॅझलवूडप्रमाणेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने देखील चिंता व्यक्त केली. विल्यम्सन आयपीएल प्रँचायझी सनरायजर्स हैदराबादशी करारबद्ध आहे. तो गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीकडे रवाना होणे अपेक्षित आहे.
रैनाला सुचले उशिराचे शहाणपण!
‘मी यंदाची आयपीएल , अजूनही खेळू शकतो’!
दुबईतून अचानक मला भारतात परतावे लागले असले तरी मी आताही दुबईला रवाना होऊ शकतो आणि यंदाची आयपीएलही खेळू शकतो, असा मोठा यू-टर्न दिग्गज डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने घेतला.
‘मी माझ्या कौटुंबिक अडचणीमुळे परतलो. तो माझ्या वैयक्तिक निर्णय होता. कारण, त्या क्षणी कुटुंबियांसमवेत असणे मला महत्त्वाचे वाटले. अर्थात, सीएसके हे देखील माझे कुटुंबच आहे आणि माही माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे, तेथून परतण्याचा निर्णय घेणे कठीण होते, असे रैना पुढे म्हणाला.
‘माझ्यात व सीएसकेत कोणतेही मतभेद नाहीत. अगदीच अडचण असल्याशिवाय कोणीही 12.5 कोटी रुपयांची रक्कम लाथाडून मायदेशी परतणार नाही. भले, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असेन. पण, अजूनही मी युवा आहे आणि चेन्नई संघातर्फे आणखी 4 ते 5 वर्षे आयपीएल खेळू इच्छितो’, असे त्याने पुढे नमूद केले. इथे क्वारन्टाईन असताना देखील मी सराव करत आहे. त्यामुळे, मी कोणत्याही क्षणी आपल्याला चेन्नई सुपरकिंग्सच्या ताफ्यात दिसू शकेन, असे तो शेवटी म्हणाला.
मुंबई इंडियन्स संघात मलिंगाऐवजी जेम्स पॅटिन्सन
यंदाच्या आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने लसिथ मलिंगाऐवजी ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला करारबद्ध केले आहे. मलिंगाने या हंगामात आपण खेळू शकणार नसल्याचे यापूर्वी मुंबई इंडियन्स प्रँचायझीला कळवले होते. जेम्स पॅटिन्सन या आठवडय़ाअखेरीस दुबईत दाखल होणे अपेक्षित आहे.
अश्विनच्या ‘त्या’ पर्यायाला रिकी पाँटिंगचे समर्थन
नॉन स्ट्रायकरवरील फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझ सोडून पुढे जात असतात. गोलंदाजाने जर ही बाब निदर्शनास आणून दिली तर त्याला काही धावांचा दंड केला जावा, अशी सूचना आघाडीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने केली होती. त्याला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिकी पाँटिंगने समर्थन दर्शवले आहे. अर्थात, मंकडिग पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याला मात्र त्याने आपला विरोध कायम ठेवला आहे.