बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांची घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोव्हिड-19 विरुद्ध लढय़ात सक्रिय सहभाग घेत 10 लिटर्सचे 2 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. विविध वैद्यकीय संघटनांना हे कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द केले जाणार आहेत. गतवर्षी कोरोनाची पहिली लाट आली, त्यावेळी देखील मंडळाने पंतप्रधान साहायता निधीला 51 लाख रुपये प्रदान केले होते.
‘पुढील काही महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ देशभरातील विविध ठिकाणी कॉन्सन्ट्रेटरचे वितरण करणार आहे. कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या या प्रदीर्घ लढय़ात वैद्यकीय व आरोग्य यंत्रणेने सर्वस्व पणाला लावले आहे. तेच यातील प्रंटलाईन वॉरियर्स आहेत आणि या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी अविरत झटत आहेत’, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली याप्रसंगी म्हणाले.
‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आरोग्य व सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि यापुढेही हाच आमचा प्राधान्यक्रम असेल. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांना यावर मात करण्यासाठी मदत मिळेल, असा विश्वास वाटतो’, असे गांगुली यांनी पुढे नमूद केले. सचिव जय शाह यांनी बीसीसीआयच्या या योगदानामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत कमी होण्यास मदत होईल, असे म्हटले. मागील महिन्यात राष्ट्रीय राजधानीला ऑक्सिजन क्रायसिसचा मोठा फटका बसला होता.
‘कोरोनामुळे आपण सर्वांनी बरेच सोसले आहे. पण, आता लसीकरण सुरु झाले आहे आणि आपण या संकटावर मात करु शकतो, असा विश्वास वाटतो. लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी शक्य तितक्या लवकर लस घ्यावी’, असे आवाहन शाह यांनी केले. 10 लिटरच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची किंमत प्रत्येकी 60 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत असते. बीसीसीआयला 1 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी 12 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.