बी-बियाणे उपलब्ध करण्याची पशुपालकांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
पशुपालकांना उत्तम प्रतीचा चारा उपलब्ध व्हावा, याकरिता दरवषी मान्सूनच्या तोंडावर बी-बियाणांचे वाटप केले जाते. मात्र, यंदा अद्याप बी-बियाणे वितरणाकडे दुर्लक्ष झाल्याने पशुपालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी आफ्रीकन टॉल जातीचा मका व इतर बियाणे दिली जायची. मात्र, कोरोनामुळे वाहतूक व्यवस्थेवर मर्यादा आल्या आहेत. शिवाय खात्याकडे बी-बियाणे आली नसल्याने त्यांचे वितरण लांबणीवर पडले आहे.
चारा संकट निर्माण होऊ नये, यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत चांगल्या प्रतीची बी-बियाणे उपलब्ध करून दिली जातात. शिवाय जनावरांना चांगल्या प्रतीचे वैरण मिळावे या दृष्टिकोनातून पशुपालकांना मका, ज्वारी व कडवळ वाटप केली जाते. मात्र, कोरोनामुळे बी-बियाणे वितरणाला बेक लागला आहे. दरवषी संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यांतून खरीप हंगामाच्या तोंडावर विविध प्रकारची बी-बियाणे पशुपालकांना दिली जायची. बी-बियाणे चांगल्या प्रतीची असल्याने दूध उत्पादनात वाढ व्हायची. त्यामुळे पशुपालकांचा बी-बियाणे घेण्यासाठी प्रतिसाद वाढायचा. दूध उत्पादकांची आर्थिक बाजू सक्षम व्हावी याकरिता दूध उत्पादक दर्जेदार व आधुनिक बी-बियाणांचे वाटप केले जाते. या संकरित बी-बियाणामुळे शेतकऱयांना अधिक उत्पादनाबरोबर चांगला प्रतीचा चारा उपलब्ध होणार आहे. मात्र, यंदा अद्याप बी-बियाणे वितरणाकडे दुर्लक्ष झाल्याने पशुपालकांना खासगी दुकानांतून ती खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खात्याने तातडीने बी-बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे.