9 लेखिकांचा समावेश : भारतीय वंशाच्या अवनी दोशी सामील
वृत्तसंस्था/ लंडन
साहित्यसृष्टीत अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱया बुकर पुरस्काराच्या शर्यतीत यंदा हिलरी मँटल, एनी टेलर आणि कीले रीड यासारख्या ख्यातनाम लेखिकांचा समावेश आहे. भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोशी यांची पहिली कादंबरी ‘बर्न्ट शुगर’ देखील पुरस्कारच्या शर्यतीत सामील आहे. 15 सप्टेंबरपर्यंत पहिल्या 6 कादंबऱयांची निवड होणार आहे. तर नोव्हेंबरमध्ये पुरस्कार विजेत्याची घोषणा होणार आहे.
यंदा 9 महिलांना पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. यातील 8 जणांना पहिल्याच साहित्यकृतीसाठी हे यश मिळाले आहे. हिलरी मँटल यांच्या ‘द मिरर अँड द लाइट’ या थॉमस क्रोमवेल साखळीतील तिसऱया कादंबरीला नामांकन मिळाले आहे. क्रोमवेल यांच्या जीवनाच्या उत्तरार्धावर हे पुस्तक आधारित आहे. 875 पानांची ही कादंबरी ब्रिटनमध्ये चर्चेत राहिली होती. क्रोमवेल 1532-40 पर्यंत इंग्लंडच्या किंग हेन्रीचे 8 वे चीफ मिनिस्टर होते. वकील आणि राजकारणी असलेले क्रोमवेल सुधारणा आणि पुनर्रचनेचे पाठिराखे होते. क्रोमवेल यांना फासावर लटकविण्यात आले होते.
हिलरी यांना यंदा हा पुरस्कार मिळाल्यास तीनेवळा बुकर पटकाविणाऱया त्या पहिल्या लेखिका ठरणार आहेत. 2009 मध्ये ‘वुल्फ हॉल’ आणि 2012 मध्ये ‘बिंग अप द बॉडीज’ या साहित्यकृतींसाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. एनी टेलर यांची ‘रेडहेड बाय द साइड ऑफ द रोड’ आणि कीले रीड यांची ‘सच ए फन एज’ या कादंबरीचे आव्हान हिलरींसमोर आहे.
बुकर विजेत्याला पुरस्कारादाखल 64,000 डॉलर्स मिळतील. यंदा ‘लकी थर्टीन’मध्ये 6 अमेरिकन लेखक आहेत, तर अन्य 3 जणांकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. या प्रतिष्ठित ब्रिटिश साहित्यिक पुरस्कारात त्यांचा प्रवेश वादाचे सबब ठरत आहे. 2014 मध्ये अमेरिकेच्या लेखकांची भागीदारी स्वीकारण्यात आली नव्हती.
आई-मुलीचे नाते उलगडणारी कादंबरी
न्यू जर्सीमध्ये जन्मलेल्या अवनी दोशी दुबईत वास्तव्यास आहेत. बर्न्ट शूगर ही कादंबरी भारतात ‘गर्ल इन व्हाइट कॉटन’ या नावाने प्रकाशित झाली. यात विस्मरणाने ग्रस्त आई अन् मुलीच्या नात्यांमधील चढउतार शब्दस्वरुपात रेखाटण्यात आले आहेत.