प्रतिनिधी/ बेळगाव
गुरुवार दि. 8 रोजी बुक लव्हर्स क्लबच्या संध्याकाळच्या कार्यक्रमात नुकत्याच निधन पावलेल्या प्रा. पुष्पा भावेंच्या जीवनाचा आढावा घेत ‘प्रा. पुष्पा भावे-एक चतुरस्त्र विदुषी’ या विषयावर बोलत अनिल आजगावकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
निडर व्यक्तिमत्त्व, स्पष्ट विचार आणि भूमिका, समीक्षक, उत्तम वक्त्या, लेखिका, असे त्यांचे बहुपेढी व्यक्तिमत्त्व होते. गोदाताई परुळेकर, मृणाल गोरे, दुर्गा भागवत, अहिल्याबाई रांगणेकर या परंपरेतीलच त्या एक होत्या. लहानपणापासून नाटय़ाची आवड, स्त्रीवर होणारा अन्याय हा सनातन काळापासून असून, काळ कोणताही असो स्त्रीच्या शरीरावर अत्याचार चालूच असतात. पुरुषांच्या मानसिकतेत बदल हवा, असे त्या म्हणत. समाजवादी चळवळीतील त्या कार्यकर्त्या होत्या व वयाच्या 81 वर्षापर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्या कार्य करीत राहिल्या. मराठी साहित्याच्या त्या प्राध्यापिका होत्या. सखोल ज्ञान, गाढय़ा व्यासंगामुळे त्यांचे शिकविणे म्हणजे साहित्याची पुष्पवृष्टी असे मेधा पाटकर म्हणायच्या. म्हणूनच त्या विद्यार्थीप्रियही होत्या. अनेक चळवळींशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले होते. आपले शेजारी रमेश किणी यांचा एका थिएटरमध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यावर बेधडकपणे त्यांनी शिवसेनेवर मत व्यक्त केले होते. नाटककार त्यांच्या समीक्षेची आवर्जून वाट पाहत असत. अनिल आजगावकरांनी अशा रितीने ऑडिओद्वारे पुष्पाताईंच्या योगदानाची सुंदरपणे माहिती दिली. प्रारंभी विद्या देशपांडे यांनी स्वागत केले व वक्त्यांची ओळख करून दिली.