निवेदनानंतर बुडा अध्यक्ष, आयुक्तांनी केली समस्येची पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याशेजारी मिलिटरी विनायक मंदिरच्या मागील बाजूस बुडाचे व्यापारी संकुल आहे. पण याठिकाणी असलेल्या नाल्यामधील पाणी व्यापारी संकुलातील गाळय़ांमध्ये शिरत असल्याने व्यावसायिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याने या समस्येचे निवारण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बुडा अध्यक्ष आणि आयुक्तांना देण्यात आले. निवेदनाची दखल घेऊन पाहणी करून उपाययोजना राबविण्याचे आश्वासन बुडा अध्यक्षांनी दिले.
हनुमान नगर रोडशेजारी असलेल्या रस्त्योशेजारी बुडाने व्यापारी संकुलाची उभारणी केली होती. पण सदर क्यापारी संकुलासमोर नाला असून नाल्याच्या काठावर संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. पण पावसाळय़ात नाला तुडूंब भरून वाहत असल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. लक्ष्मी टेकडी, कॅम्प तसेच विविध परिसरातील पाणी या नाल्याद्वारे वाहत असते. तसेच गणपती मंदिरसमोर असलेले तलाव पावसामुळे तुडूंब भरल्यानंतर ओव्हरल्फो झालेले पाणी नाल्यामधून वाहते. त्यामुळे व्यापारी संकुलातील 13 गाळय़ांमध्ये पाणी शिरत आहे. तसेच नाल्याचे पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेली गटार अरूंद असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गाळय़ांमध्ये पाच फूट पाणी साचून व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. दरवर्षी पावसाळय़ात ही समस्या निर्माण होत असल्याने व्यावसायिकांना दरवषी 60 ते 80 हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे समस्येचे निवारण करण्यासाठी पाहणी करून आवश्यक उपायोजना राबविण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन बुडा अध्यक्ष आणि आयुक्तांना देण्यात आले होते.
लवकरच सोडवू- बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी
निवेदनाची दखल घेऊन बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, आयुक्त प्रितम नसलापुरे आणि कार्यकारी अभियंते एम. व्ही. हिरेमठ आदीनी मंगळवारी पाहणी केली. या समस्येची माहिती घेऊन उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच लवकरच ही समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांनी दिले. पाहणीवेळी बी. एम. पाटील, लोहित अर्कसाळी, सतीश शिग्गेहळळी, प्रवीण सांसुद्दी, बसवराज होसमनी आदींसह व्यावसायिक उपस्थित होते..