पाच जणांचे मृतदेह हाती- 19 जणांना वाचवण्यात यश- मध्यप्रदेशात दुर्घटना
@ भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील विदिशा जिह्यातील गंजबासोदा भागात नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली. विहिरीत पडलेल्या मुलाचा शोध सुरू असताना परिसरात झालेल्या गर्दीमुळे जवळपास 24 जण विहिरीत कोसळले. या दुर्घटनेनंतर परिसरात हाहाकार निर्माण झाला. यानंतर राबविण्यात आलेल्या मदत व बचावकार्यावेळी 19 जणांना वाचवण्यात यश आले असून 5 जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाकडून गुरुवारी मध्यरात्रीपासून बचावकार्य सुरु होते. बचावकार्य सुरू असताना एक ट्रक्टरही विहिरीत पडल्यामुळे ट्रक्टरमधील 3 जवान विहिरीत पडले. अखेर पोकलेनने विहिरीची भिंत तोडून जवानांना बाहेर काढण्यात आले.
प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, एक 14 वर्षांचा मुलगा गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विहिरीत पडला होता. त्याला वाचवण्यासाठी विहिरीबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली. गर्दीमुळे विहिरीचा कठडा तुटला आणि अनेक लोक खोल विहिरीत कोसळले. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यानंतर 19 लोकांना वाचवण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी याबाबत दुःख व्यक्त करत तात्काळ मदतीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार किमान 24 जण विहिरीत पडले होते. कठडा तुटल्यानंतर या भागात एकच गोंधळ उडाला होता. गर्दीतील माणसे विहिरीत पडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून आपत्ती निवारण दलाला आणि होमगार्डलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी दिवसभर येथे मदत व बचावकार्य सुरू होते. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाखांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत राज्य सरकारने घोषित केली आहे.