बुडा आयुक्त पदाबाबत खो-खो चा खेळ
बेळगाव / प्रतिनिधी
बुडा आयुक्तपदी दिनेशकुमार जी. टी. यांची नियुक्ती काही दिवसापूर्वी झाली होती. पण दिनेशकुमार जी. टी. यांची लागलीच बदली करण्यात आली आहे. बुडा आयुक्त पदाचा कार्यभार पुन्हा प्रितम नसलापुरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त पदाच्या खुर्चिसाठी बुडा कार्यालयात सध्या खो खो चा खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले.
बुडा आयुक्तपदाची जबाबदारी प्रितम नसलापुरे यांच्याकडे होती. पण काही दिवसापूर्वी त्यांची बदली काडा कार्यालयात करण्यात आली होती. तसेच बुडा अध्यक्षपदाची जबाबदारी दीनेशकुमार जी. टी. यांच्याकडे सोपविण्यात आल्याचा आदेश आला होता. यानुसार दीनेशकुमार जी. टी. यांनी बुडा अध्यक्ष पदाचा कार्यभार घेतला होता. पण कार्यभार स्विकारण्यासाठी आले असता काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. याच दरम्यान प्रितम नसलापुरे हे बेंगळूरला गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत दीनेशकुमार जी. टी. यांनी दुसऱया दिवशी कार्यभार स्विकारला. त्यामुळे प्रितम नसलापुरे बदली रद्द करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. पण दीनेशकुमार जी. टी. यांनी कार्यभार घेतल्याने या चर्चेवर पडदा पडला होता. मात्र बुडा आयुक्तपदी प्रितम नसलापुरे यांची फेर नियुक्ती झाल्याचा आदेश गुरूवारी संध्याकाळी झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी बुडा कार्यालयात दाखल होऊन प्रितम नसलापुरे यांनी बुडा आयुक्त पदाचा कार्यभार पुन्हा हाती घेतला. त्यामुळे दिनेशकुमार जी. टी. यांची बदली अन्यत्र झाली आहे. त्यांची बदली कुठे झाली याची माहिती होऊ शकली नाही.