वृत्तसंस्था/ कोलकाता
कोरोनाने ग्रस्त पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना कोलकाता येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यावर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे.
यापूर्वी त्यांना घरातच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. 77 वर्षीय राजकीय नेत्याला क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) असल्याने त्यांना अन्य वैद्यकीय तपासणीची गरज होती असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
भट्टाचार्य 18 मे रोजी कोरोनाबाधित आढळून आले होते. रुग्णालयात दाखल होण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांच्या पत्नी मीरा भट्टाचयां देखील मागील आठवडय़ात कोरोनाबाधित आढळल्या होत्या. त्यांना शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संक्रमणातून मुक्त झाल्यावर सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.