वृत्तसंस्था/ प्युनेटा प्रिमा (स्पेन)
रविवारी येथे झालेल्या पहिल्या चेसबल सनवे फॉरमेंट्राचा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद भारतीय ग्रॅण्डमास्टर्स डी. गुकेशने पटकाविले. अलिकडच्या कालावधीतील गुकेशचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे.
भारताचा 15 वर्षीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू डी. गुकेशने (इलो 2637) यापूर्वी ला रोडा तसेच त्यानंतर मेर्नोका बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्या होत्या. स्पेनमधील झालेल्या स्पर्धेतील शेवटच्या फेरीत गुकेशने अर्मेनियाचा ग्रॅण्डमास्टर मार्टीरोसियानला बरोबरीत रोखले. गुकेशने 8 गुणांसह या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील नवव्या फेरीत गुकेशने आपल्याच देशाच्या ग्रॅण्डमास्टर के. शशीकिरणचा पराभव केला होता. गुकेशने या स्पर्धेत सहा डाव जिंकले असून चार डाव बरोबरीत सोडविले आहेत. या स्पर्धेत के. शशीकिरणने 5.5 गुणांसह नववे स्थान मिळविले आहे.