राज्यभरात सर्व ग्रामीण, शहरी भागात लागण : मंत्री, आमदारही होऊ लागले बाधित : लॉकडाऊनच्या मागणीचा जोर कायम
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोना बळींची व रुग्णांची संख्या वाढत असून काल बुधवारी एका दिवसात आठ रुग्णांचा बळी गेला. आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या 124 झाली आहे. आता सर्वसामान्यांसह आमदार, मंत्री यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागल्याने त्यास गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. बुधवारी 357 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 342 नवे रुग्ण सापडले. सक्रिय रुग्णांची संख्या 3838 झाली असून 100 जणांना संशयित रुग्ण म्हणून गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डामध्ये भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 12675 जणांना कोरोनाची लागण झाली असून 8713 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बळी गेलेल्यांमध्ये आंगड-म्हापसातील 62 वर्षीय, इंदिरानगर-चिंबल येथील 52 वर्षीय, शिरोडा-फोंडा येथील 74 वर्षीय, बेती-रेईश मागूश येथील 68 वर्षीय महिला, तळावली-फोंडा येथील 81 वर्षीय, घोगळ-मडगाव येथील 62 वर्षीय, मडगाव येथील 71 वर्षीय आणि मडगावमधील एका अनोळखी रुग्णाचा समावेश आहे. या सर्वांना इतर आजार होते आणि त्याचा परिणाम म्हणूनच मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य खात्याने केला आहे. काहींचा मृत्यू आधीच झाला होता आणि नंतर त्यांची कोरोना तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह सापडले, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
227 जणांचे होम आयसोलेशन
गोव्यात विविध मार्गाने आलेल्या चार जणांना कोरोनाची बाधा झाली असून 227 जणांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. विविध हॉटेल्स, रेसिडेन्सीमध्ये 32 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. 593 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. 14 देशी प्रवाशांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून दोघांना संस्थात्मक क्वॉरंटाईन केले आहे.
सचिवालय कर्मचाऱयांची सुट्टीची मागणी
कोरोनाचे रुग्ण असलेल्या आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात तसेच नवीन गावातही कोरोनाबाधित वाढत असून शहरातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील कोरोनाचे संकट अधिकच भयाण होत चालले आहे. प्रत्येक दिवशी कोरोनाचे बळी जात आहे. यावर नियंत्रण यावे म्हणून कोणतीच उपाययोजना केली जात नाही, अशी जनतेची तक्रार आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे, अशी मागणी जनतेमधून होत असून सचिवालयातील कर्मचारीवर्गाने तर काही दिवस सुट्टी देण्याची मागणी केली आहे.
कोरोनामुळे गोमेकॉ तसेच मडगावातील कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत असलेल्या इतर आजार बळावलेल्या रुग्णांचे जीव जात असून त्यांना कोणीच वाली नसल्याचे समोर येत आहे. दररोज अनेक रुग्णांचे बळी जात असून अनेक जणांची प्रकृती गंभीर होत आहे. गोव्यासाठी ही धोक्याची घंटा ठरते की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य केंद्रनिहाय कोरोना रुग्णसंख्या
डिचोली 26
सांखळी 113
पेडणे 169
वाळपई 134
म्हापसा 119
पणजी 197
हळदोणा 56
बेतकी 74
कांदोळी 97
कासारवर्णे 45
कोलवाळ 105
खोर्ली 113
चिंबल 226
शिवोली 49
पर्वरी 158
मये 102
कुडचडे 90
काणकोण 41
मडगाव 491
वास्को 351
बाळ्ळी 42
कासावली 105
चिंचिणी 26
कुठ्ठाळी 107
कुडतरी 98
लोटली 63
मडकई 65
केपे 87
सांगे 53,
शिरोडा 64
धारबांदोडा 86
फोंडा 220
नानेली 62
20 ऑगस्ट कोरोना ग्राफ वापरणे
चर्चिल आलेमाव व पत्नी कोरोनाबाधित
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यातील राजकारण्यांना आता कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. बाणावली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव व त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झालेली आहे. कोरोना संसर्गाची सकारात्मक चाचणी येणारे ते गोव्यातील चौथे आमदार ठरले आहेत.
चर्चिल आलेमाव व त्यांची पत्नी फातिमा यांनी कोरोना संसर्गाची चाचणी करून घेतली असता दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. चर्चिल आलेमाव यांना गेले काही दिवस सर्दी झाली होती. आपण स्वतःहून कोरोनाची चाचणी करून घेतली असता आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आपण कोरोनापासून लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी हे सांगण्यासाठी मतदारसंघात फिरत होतो. तसेच कुडतरी मतदारसंघातही भेट दिली होती. ज्या भागात कोरोनाच्या केसीस आढळून आल्या होत्या. त्यातूनच आपल्याला कोरोनाची बाधा झाली असावी अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाची बाधा होणारा चौथा आमदार ठरला
कुंकळळी मतदारसंघातील भाजपचे आमदार क्लाफास डायस, थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर आणि मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर हे यापूर्वीच कोरोना चाचणीत सकारात्मक आढळून आले आहे. आमदार क्लाफास डायस उपचारानंतर घरी परतले आहेत.
उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाही कोरोनाची बाधा झाली असून ते मणिपाल हॉस्पिटलात उपचार घेत आहेत. दिल्लीत एम्स हॉस्पिटलातील तज्ञ डॉक्टरांचे पथक मणिपाल हॉस्पिटलात येऊन खा. नाईक यांच्या आरोग्याची तपासणी करून काल पुन्हा दिल्लीला रवाना झाले.
मडगाव कोविड हॉस्पिटलात : बळींची संख्या पंचाहत्तरी पार
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात 22 जून रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. काल बुधवार दि. 19 ऑगस्टपर्यंत या हॉस्पिटलात बळी गेलेल्याची संख्या 78 वर पोचली आहे. काल बुधवारी या हॉस्पिटलात आणखीन तिघांचा बळी गेला. त्यात एका अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे. ही व्यक्ती कुठली, कुठून आलेली याचा ठाव ठिकाणा कुणालाच नाही. या व्यक्तीचा मंगळवारी रात्री उशिरा बळी गेला होता.
घोगळ-मडगाव येथील 62 वर्षीय व्यक्तीचा बळी बुधवारी पहाटे 4.45 वा. गेला. काल दुपारी 1.10 वा. मोती डोंगरावरील एका 71 वर्षीय पुरूषाचा बळी गेला. मोती डोंगरावर बळी गेलेल्याची संख्या आत्ता तीनवर पोचली आहे. मडगावचे कोविड हॉस्पिटल रूग्णांनी पूर्ण भरले असून या ठिकाणी आत्ता रूग्णांना ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे कोरोनाचे रूग्ण गोमेकॉत पाठवून दिले जात आहेत. गोमेकॉत त्याचे बळी जाऊ लागले आहेत. मडगावच्या कोविड हॉस्पिटलाचे आयटीयू आणि आयसीयू दोन्ही विभाग रूग्णांनी भरलेले आहेत. आयसीयूमधील रूग्णांची प्रकृती नाजूक आहे.
माजी निवृत्त पोलीस अधीक्षक टॉनी फर्नांडिस यांना प्लाज्मा देण्यात आला असून अन्य काही रूग्णांनाही प्लाज्मा दिलेला आहे. अशा रूग्णांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
रूग्णांना आत्ता ‘सोडेक्सो’ तर्फे जेवण दरम्यान, मडगावच्या कोविड हॉस्पिटलातील रूग्णांना आत्ता ‘सोडेक्सो’ तर्फे जेवण पुरविले जाणार आहे. गेले काही दिवस रूग्णांना व्यवस्थित जेवण मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी होत्या. रूग्णांच्या कुटूंबियांनी घरातून जेवण आणले तरी ते रूग्णांना देण्यास मज्जाव केला जात होता. या प्रकारावर सावईवेरे-फोंडा येथील ऍड. सत्यवान पालकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रूग्ण कोरोनामुळे नव्हे तर भूके पोटी मरण पावतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. ऍड. पालकर यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात या प्रकाराची कल्पना दिली होती.