बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम सुरु झाली आहे.
कर्नाटकात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. राज्यात कोरोनाने बुधवारी ७०० चा टप्पा ओलांडला. दरम्यान राज्यात बुधवारी ७६० कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून ३३१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ६ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७,४५६ इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणारे सर्वाधिक रुग्णही बेंगळूरमध्येच आहेत. दरम्यान बुधवारी जिल्ह्यात ४८८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर १४६ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या देखील ५,५२६ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.