न्यायालयातील हजेरीनंतर कारागृहात रवानगी : कुटुंबीय-नातेवाईकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
म. ए. समिती आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना खोटय़ा गुह्यांमध्ये अनेकांना गोवण्यात आले. विविध पोलीस स्थानकांमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. निष्पाप कार्यकर्त्यांना त्रास करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या गुह्यासाठी बॉडी वॉरंट घेण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करून पुन्हा त्यांची रवानगी कारागृहात केली आहे
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान करण्यात आला. त्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी दगडफेक केली, असा आरोप करत या निष्पाप तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांना वारंवार न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
बुधवारी युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, अंकुश केसरकर, रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 38 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी एपीएमसी पोलीस स्थानकाकडे नेले. पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांची रवानगी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. कार्यकर्ते आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.