वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपला सहभाग दर्शवित आहे. तथापि त्याने इंग्लीश कौंटी क्रिकेटमध्ये सहभागी होवून दमछाक करून न घेता विश्रांती घेण्याला प्राधान्य द्यावे, असे मत पाकचा माजी वेगवान गोलंदाज वासीम अक्रमने केले आहे.
भारतीय क्रिकेट संघातील बुमराह हा एक हुकमी वेगवान गोलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. आजपर्यंत त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आतापर्यंत त्याने ब्रिटनमधील इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नाही. कोरोना महामारी संकटामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे बुमराहला आपल्या घरातच लॉकडाऊनमुळे राहावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे मैदानावर सराव करता येत नाही. मात्र त्याने कौंटी क्रिकेटच्या मागे लागून दमछाक करून घेण्याऐवजी विश्रांती घेण्याचा विचार करावा, असा सल्ला वासीम अक्रमने बुमराहला दिला आहे.