मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराहने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 धावांमध्येच 4 फलंदाज गारद केले आणि हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत त्याने कॅगिसो रबाडाला पिछाडीवर टाकत अव्वलस्थान काबीज केले. सध्या बुमराहच्या खात्यावर 14 सामन्यातून 27 बळी आहेत.
याच लढतीत बुमराहचा संघसहकारी ट्रेंट बोल्टने 2 बळी घेतले आणि एकूण 22 बळींसह तो या यादीत तिसऱया स्थानी पोहोचला. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा जलद गोलंदाज ऍनरिच नोर्त्जेने एक बळी घेत पहिल्या पाचमध्ये पुन्हा एकदा स्थान प्राप्त केले. नोर्त्जेच्या खात्यावर 14 सामन्यात 20 बळी असून तो पाचव्या स्थानी आहे. दिल्लीचा कॅगिसो रबाडा या लढतीत एकही बळी घेऊ शकला नाही आणि यामुळेही त्याला अव्वलस्थान खालसा करावे लागले. राजस्थानचा जोफ्रा आर्चर या हंगामात 20 बळी मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
दरम्यान, अव्वलस्थान काबीज करणाऱया बुमराहने आपण अंतिम निकालाकडे फारसे लक्ष न देता केवळ आपल्याला दिली गेलेली जबाबदारी चोख पार पाडण्यावर पूर्ण भर देतो, असे म्हटले आहे. बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईला दिल्लीवर 57 धावांनी सहज मात करता आली.
‘मला बळी मिळाले नाहीत. पण, संघाने स्पर्धा जिंकली, तरीही मी खुश असेन. जी जबाबदारी माझ्याकडे सोपवली गेली, ती काटेकोरपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असतो. कर्णधार ज्यावेळी चेंडू सोपवेल, त्या-त्यावेळी मी सज्ज असतो’, याचा त्याने पुढे उल्लेख केला. बुमराहने बहरातील डावखुरा फलंदाज शिखर धवनला एका भेदक यॉर्करवर त्रिफळाचीत केले आणि नंतर सातत्याने प्रतिस्पर्ध्यांवर वरचष्मा गाजवला. या लढतीत त्याने धवनसह श्रेयस अय्यर, स्टोईनिस, डॅनिएल सॅम्स यांनाही तंबूचा रस्ता दाखवला.