जम्मू / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरात बुरखाधारी महिलेने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका बंकरवर बाँबफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही फिरत आहे. यामुळे बंकरला आग लागल्याचे व्हिडीओत दिसत असून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे सैनिक आग विझवतानाही दिसत आहेत. मात्र, या व्हिडीओची अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. चौकशी करण्यात येत आहे.
महिलांची दहशतवादी संघटना दुख्तरान ए मिलतची ही महिला हस्तक आहे, असा दावा करण्यात आला आहे. या संघटनेची स्थापना 1987 मध्ये झाली होती. या संघटनेचे नेतृत्व आसिया अंद्राबी या महिलेकडे आहे. फहमीदा सोफीसोपोर तिची सहकारी आहे. या दोन्ही महिला सध्या तिहार कारागृहात आहेत.
शोधअभियान सुरुच
काश्मीरात दहशतवादी हुडकण्याचे अभियान सेना आणि पोलिसांनी सुरुच ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी एका चकमकीत लष्कर ए तोयबाचे रईस अहमद भट आणि हिलाल आहराह यांना टिपण्यात आले होते. रईस अहमद काश्मीरात एक वृत्तवाहिनीही चालवत होता, असे तपासात आढळून आले आहे.