परिवहनमंत्री श्रीरामुलू यांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात बुरुड समाजासाठी निगमची सुरुवात करावी, केतेश्वर भवनासाठी दोन एकर जमीन मंजूर करावी, शासन दरबारी केतेश्वर जयंती साजरी क्हावी, या मागण्यांसाठी बेळगाव जिल्हा बुरुड समाजाने विधानसौध परिसरात आंदोलन छेडले आणि या मागण्यांचे निवेदन परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू यांच्याकडे सुपूर्द केले.
जिल्हय़ात अनुसूचित जाती-जमातीचे प्रमाणपत्र इतर जातीचे लोक घेत आहेत आणि शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. अशा अनधिकृत कागदपत्रे घेणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील बेळगाव जिल्हा बुरुड समाजाने केली आहे. याबरोबरच अलीकडे बुरुड समाजाला पारंपरिक व्यवसाय चालविण्यासाठी बांबूची कमतरता भासत आहे. यासाठी शासनाने पाठपुरावा करून बांबू सुरळीत मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत. याबरोबरच बुरुड समाजाला विविध सवलती पुरवून कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही बुरुड समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावेळी अध्यक्ष मल्लेश कोंडे, गुंडू कुकडे, प्रकाश साळुंखे, लक्ष्मण बुरुड, प्रकाश नेसरीकर, राजू गोकाक, राजू नेसरकर, राजू मेदार, बसू मेदार, सागर बेळगावकर, लक्ष्मीकांत कंत्राटदार, उत्तम किणेकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.