प्रतिनिधी/ दापोली
तालुक्यातील बुरोंडी-तेलेश्वरनगरातील व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी अद्याप परिसरात शुकशुकाट पसरलेला दिसत आहे.
ही व्यक्ती मुंबई येथून होळीनिमित्त दापोलीत आली होती. शिवाय लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे येथे अडकून पडली होती. मुंबईतून आल्यामुळे त्या व्यक्तीची तपासणी करून हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारण्यात आला होता. त्याची मुदत 14 दिवसांची होती. ती मुदत संपल्यानंतर या व्यक्तीला अचानक छातीत दुखू लागल्याने गावातील लोकांनी उपजिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. मात्र त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठवले होते. ते शनिवारी रात्री उशिरा दापोली प्रशासनाला प्राप्त झाले. यात ही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तरीही गावात खबरदारी म्हणून जंतुनाशक फवारणी करण्यात आली असून लोकांनी अत्यावश्यक गरजेव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.