प्रतिनिधी/ बेळगाव
इंडियाज मोस्ट फियरलेस या शिव अरुर-राहुल सिंग या दोघांनी लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय सोज्वळ पाटील यांनी करुन दिला. प्रारंभी सिंधूताई सपकाळ, गायक रामदास कामत, मेहता प्रकाशनाचे सुनील मेहता यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. किशोर काकडे यांनी स्वागत करून वक्त्यांचा परिचय करुन दिला. बुलकचे प्रभारी अध्यक्ष चैतन्य हलगेकर यांना जगदीश कुंटे यांनी पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
विमान अपघातात निधन झालेले सीडीएस बिपीन रावत यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. भारतीय सैन्यातील 28 शौर्य कथा नायकांपैकी अशोक चक्र सन्मानित मेजर मोहीत शर्मा, शौर्य पदक सन्मानित कॅप्टन पवनकुमार यांच्या दोन थरारक कथा सोज्वळ यांनी सांगितल्या. मेजर मोहीत शर्मा यांचा गुरुवारी वाढदिवस होता आणि त्यांनी बेळगावच्या कमांडो केंद्रांत दोन वर्षे सेवाही बजावली होती.
काश्मीर परिसरातील बर्फाच्छादीत दाट जंगलात एका इमारतीत लपलेल्या आतंकवाद्यांशी केलेल्या चकमकीच्या या शौर्य गाथा होत्या. या युवा सैनिकांच्या कथा प्रेरणादायी तर आहेतच तर त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीतही अनोखी माहिती देणाऱया आहेत, याचे प्रत्यंतर उपस्थितांना आले.