कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिनकडून दरकपातीची घोषणा : आजपासून खासगी केंद्रांवर लसीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन बनवणाऱया कंपन्यांनी शनिवारी कोरोना प्रतिबंधक लसींच्या किमती कमी करण्याची घोषणा केली. बुस्टर डोससाठी आता खासगी रुग्णालयांमध्ये या दोन्ही लसींच्या डोसची किंमत 225 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी, खासगी रुग्णालयांमध्ये, कोव्हिशिल्डचा डोस 600 रुपयांना आणि कोव्हॅक्सिनचा डोस 1,200 रुपयांना मिळत होता. रविवारपासून खासगी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षांवरील लाभार्थींना म्हणजेच प्रौढांना बूस्टर डोस उपलब्ध होणार आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना मात्र सरकारी लसीकरण केंद्रांवर हा डोस मोफत दिला जाणार आहे.
प्रौढांना बुस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे लसनिर्मात्या कंपन्यांनी स्वागत केले आहे. कोव्हिशिल्ड बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अदार पूनावाला यांनी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करत एका ट्विटमध्ये लसीची किंमत कमी करण्याची घोषणा केली. सीरम कंपनी खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिशिल्डच्या डोससाठी 600 रुपयांऐवजी 225 रुपये आकारेल, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दुसरीकडे, लस बनवणाऱया भारत बायोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा अल्ला यांनीही एका ट्विटमध्ये लसीची किंमत 1,200 रुपयांवरून 225 रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना 10 एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे. सर्व प्रौढ नागरिकांना बुस्टर डोस लागू करण्याच्या निर्णयानंतर किंमत कपात जाहीर करण्यात आली आहे.
सध्या सरकारी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी, प्रंटलाईन वर्कर्स आणि 60 हून अधिक वर्षे वय असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात येत आहे आणि ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. आतापर्यंत 2.4 कोटी बूस्टर डोस हे आरोग्य कर्मचारी, प्रंटलाईन वर्कर्स आणि 60 हून अधिक वयोमान असलेल्यांना देण्यात आले आहेत. तसेच भारतातील 15 वर्षांवरील 96 टक्के व्यक्तींनी आतापर्यंत लसीचा पहिला डोस, तर 83 टक्के व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
बुस्टर डोस कुठे व कोणाला मिळेल?
18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळू शकेल. तथापि, नऊ महिन्यांपूर्वी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आता खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीचा बूस्टर डोस घेता येईल, असे आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले. साहजिकच लस लाभार्थी दुसऱया डोसनंतर 9 महिने पूर्ण केल्यावरच बुस्टर डोस घेऊ शकेल. सरकारी आदेशानुसार, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी, बुस्टर डोस सरकारी केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. मात्र, सरकारतर्फे सुरू असलेला पहिला आणि दुसरा डोस मोफत देण्याची सुविधा सर्वांसाठी सुरूच राहणार आहे.
बुस्टर डोसमध्ये कोणती लस?
यापूर्वी लाभार्थींनी जी लस घेतली आहे त्याच कंपनीची लस लाभार्थ्यांना बुस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे. साहजिकच तुम्हाला कोव्हिशिल्डचे दोन डोस मिळाल्यास, बुस्टर डोस देखील कोव्हिशिल्ड कंपनीचाच असेल. तसेच जर कोव्हॅक्सिनचे दोन डोस लावले असतील, तर बुस्टर डोसही कोव्हॅक्सिनचाच दिला जाणार आहे.