नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय आरोग्य विभागाने इतर संबंधित संस्थांशी चर्चा करुन कोरोना लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता सुनिश्चित करावी, अशी सूचना संसदीय समितीने केली आहे. ओमिक्रॉन या नव्या कोरोना रुपाची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असून त्याच पार्श्वभूमीवर बूस्टर डोसची नेमकी आवश्यकता काय आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात निश्चित धोरण आखण्याची आवश्यकता असून हे कार्य केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केले पाहिजे. रोगप्रतिकारशक्तीवरील राष्ट्रीय सल्लागार गट आणि राष्ट्रीय तज्ञ गट यांसारख्या संस्थांचे साहाय्य या कार्यात घ्यावे, असेही समितीने सुचविले आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. ते केव्हा आणि कशाप्रकारे डोके वर काढेल हे सांगता येत नाही. या अनिश्चितेमुळे यासंबंधी अधिक दक्षता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे महत्वाचे प्रतिपादनही या संसदीय समितीने केले आहे.