आयसीएमआर प्रमुख बलराम भार्गव यांची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीवर नियंत्रण येत असतानाच ओमिक्रॉन व्हेरियंटने पुन्हा जगापुढे धास्ती निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस दिला जावा, अशी मागणी पुढे आली आहे. या मागणीबाबत इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) प्रमुख बलराम भार्गव यांनी दुसऱया डोसनंतर नऊ महिन्यांनी बुस्टर डोस दिला जावा, अशी शिफारस संसदीय समितीला केली आहे.
आयसीएमआरच्या या शिफारशीनंतर संसदीय समितीनेही केंद्र सरकारला सूचना करताना तातडीने याबाबत निर्णय घेतला जावा, असे म्हटले आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. ते केव्हा आणि कशाप्रकारे डोके वर काढेल हे सांगता येत नाही. या अनिश्चितेमुळे यासंबंधी अधिक दक्षता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करुन सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. तर शनिवारी पुन्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा आणि कोरोना व्हॅक्सीन, बूस्टर डोस संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारी 2.30 वाजता कॅबिनेट सचिवांची बैठक होणार आहे.
अभ्यासांती शिफारस
जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची धास्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीचा बूस्टर डोसबाबत चर्चा, सल्ले दिले जाऊ लागले आहेत. तथापि हा बूस्टर डोस नेमका केव्हा घेतला जावा, याबाबत धोरण निश्चित करण्याकरता आयसीएमआरची मदत घेण्यात आली होती. संसदीय समितीने याबाबत आयसीएमआरला सूचना केल्या होत्या. त्यानंतर अभ्यासाअंती हा बुस्टर डोस कोरोना प्रतिबंधक दुसरी लस घेतल्यानंतर नऊ महिन्यांनी घेतली जावी, अशी शिफारस आयसीएमआरने केली समितीला केली आहे. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी कोरोनासंदर्भात झालेल्या एका महत्वाच्या बैठकीनंतर संसदीय समितीला याविषयी शिफारस केली आहे. तथापि 100 टक्के नागरिकांचे लसीकरण वेगाने पूर्ण करुन हा उपक्रम सुरु करावा लागेल, असे मत मांडले आहे.
केंद्राने नेमके धोरण आखावे
केंद्रीय आरोग्य विभागाने इतर संबंधित संस्थांशी चर्चा करुन बूस्टर डोसची आवश्यकता सुनिश्चित करावी, अशी सूचना संसदीय समितीने केली आहे. ओमिक्रॉनची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात निश्चित धोरण आखण्याची आवश्यकता असून हे कार्य केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने करावे. रोगप्रतिकारशक्तीवरील राष्ट्रीय सल्लागार गट आणि राष्ट्रीय तज्ञ गट यांसारख्या संस्थांचे साहाय्य या कार्यात घ्यावे, असेही संसदीय समितीने सुचविले आहे.
कोव्हिशिल्डची शिफारस
आयसीएमआरच्या संशोधकांनी नुकतेच याबाबत सविस्तर अभ्यास, संशोधन केल्यानंतर कोव्हिशिल्ड कोविड-19 लसीचे बूस्टर डोस म्हणून वापरण्याचा सल्ला दिला आहे. डेल्टा डेरिव्हेटिव्हच्या विरोधात या लसीचा प्रभाव लक्षात घेऊन हा सल्ला देण्यात आला आहे. या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्ड व्हॅक्सीन कोरोनाच्या अनेक प्रकरणांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह कमी करणे आणि जीवघेणी लक्षणे दूर करण्यास प्रभावी ठरले आहे. याच व्हॅक्सीनचा बूस्टर डोस दिल्यास कोरोनाविरुद्ध इम्युन सिस्टिम साधण्यात मदत होईल, असा दावा या तज्ञांनी केला आहे.
आयसीएमआरचे माध्यमांना आवाहन
दरम्यान, बलराम भार्गव यांनी माध्यमांना आवाहन करताना नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनबाबत लोकांमध्ये भीती पसरणार नाही, असे वृत्त प्रसारित करावीत, असे म्हटले आहे. ओमिक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर दबाव आलेला नाही. कोरोनाच्या उपचारातही कुठलाही बदल झालेला नाही. यासंदर्भात अधिकाधिक बैठका घेऊन शास्त्राrय पुराव्यांचा शोध घेतला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राकडून 100 टक्के लसीकरणावर भर
केंद्र सरकारला कोरोना लसीचे बूस्टर डोस देण्यापूर्वी दोन एक्सपर्ट समूहांनी आधी शंभर टक्के लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, बूस्टर डोस देण्यापूर्वी नागरिकांच्या लसीकरणावर भर आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.
सीरमकडे बूस्टर डोस उपलब्ध, केंद्राने निर्णय घ्यावा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य सरकारने सध्या सर्व नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण करण्यावर भर दिला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांना ओमिक्रॉनचा फार काही त्रास होत नाही असे दिसून आले आहे. तथापि बूस्टर डोस द्यायचा असेल तर त्याचा निर्णय देश पातळीवर झाला पाहिजे. पहिल्या आणि दुसऱया डोसचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने घेतला होता. सीरम इान्स्टिटय़ूटकडे तिसरा बूस्टर डोस उपलब्ध आहे. तथापि याचाही निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, असे ते म्हणाले.