वृत्तसंस्था / पणजी
रशियन प्रतिस्पर्धी अर्तिश लॉप्सन माझ्यापेक्षा उंच प्रतिस्पर्धी आहे. पण, माझ्या दृष्टीने तो अद्याप अगदीच नवखा आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा स्टार व्यावसायिक मुष्टियोद्धा विजेंदर सिंगने सोमवारी दिली. या उभयतात दि. 19 रोजी येथील कॅसिनो प्राईडवर सुपर मिडलवेट (76 किलोग्रॅम) गटातून लढत रंगणार असून मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो शिपच्या रुफटॉप डेकवर उभयतात सामना होणार असल्याने याला ‘बॅटल ऑन शिप’, असे ओळखले जात आहे.
विजेंदर सिंग व लॉप्सन हे दोघेही गोव्यात दाखल झाले असून त्यांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. व्यावसायिक मुष्टियुद्धात उतरल्यानंतर विजेंदर अद्याप अपराजित राहिला असून ही विजयी घोडदौड कायम राखण्याचा त्याचा निर्धार आहे.
विजेंदरचा प्रतिस्पर्धी लॉप्सनला 6 फूट 4 इंच अशी ताडमाड उंची लाभली आहे. मात्र, रिंगमध्ये 13 व्या विजयावर कब्जा करण्याच्या निर्धाराने पछाडलेल्या विजेंदरने लॉप्सनची उंची हा फारसा महत्त्वाचा घटक नसेल, असा दावा केला आहे.
‘लॉप्सन उंच आहे. त्यामुळे, मी प्रारंभी संथ सुरुवात करेन. पण, त्याला जमीनदोस्त करेन, असा मला विश्वास वाटतो. मुष्टियुद्धात उंची हेच सर्व काही अजिबात नसते. जिंकण्यासाठी तेथे ताकद व रणनीती आवश्यक असते. माझ्याकडे अनुभव आहे आणि लॉप्सन या निकषावर अगदीच नवखा आहे’, असे विजेंदर याप्रसंगी म्हणाला. प्रतिस्पर्धी जितका ताकदवान असेल, तितकी त्याला मात करण्यात रंगत येईल, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
‘या लढतीसाठी मी महत्त्वाकांक्षी आहे आणि सरावाला सुरुवात केली आहे. पण, खडतर तयारी टाळलेली आहे. वजन मर्यादित ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. गोव्यात नेहमीप्रमाणे बरीच गजबज आहे आणि या राज्याला भेट देणे हा नेहमीच उत्तम अनुभव असतो. येथील लढतीबाबत मी सकारात्मक आहे’, असे विजेंदर नंतर म्हणाला.
शब्दापेक्षा कृतीने बोलेन : लॉप्सन
दरम्यान, विजेंदरचा प्रतिस्पर्धी लॉप्सनने शब्दाने बोलण्याऐवजी कृतीने बोलणे आपल्याला अधिक पसंत असेल, असे म्हटले. विजेंदर हा चांगला फायटर आहे. पण, मी त्याला येथे पराजित करण्यासाठी आलो आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच त्याला जेरीस आणण्याचा माझा विचार आहे. त्याच्या घरच्या चाहत्यांसमोर त्याला नमवणे आकर्षक असेल. विजेंदरला रिंगमधील वेळ कठीण जाईल, याची मला खात्री वाटते, याचाही लॉप्सनने उल्लेख केला.
विजेंदर सिंग आपल्या पूर्ण व्यावसायिक कारकिर्दीत 12-0 अशा एकतर्फी फरकाने विजयी ठरत आला असून यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये दुबईत झालेल्या शेवटच्या लढतीत त्याने घानाचा माजी राष्ट्रकुल विजेता चार्ल्स ऍडम्यूला नॉकआऊट केले होते.