एक नंबर बॅडगी मिरचीचा भाव 350 ते 400 रुपये
प्रतिनिधी/ बेळगाव
तिखटाला मिरचीचा चांगलाच ठसका बसला असून बॅडगी मिरचीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे वर्षभराच्या तिखटाची तजवीज करणाऱया गृहिणीवर्गाला महागाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली असून शनिवारच्या बाजारात बॅडगी मिरचीचा भाव 350 ते 400 रुपये असल्याचे दिसून आले. मसाल्याच्या दराबरोबरच मिरचीचा भावदेखील वाढला असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
विवाह सोहळे तसेच सण-समारंभांच्या पार्श्वभूमीवर गृहिणींना प्रथम तिखटाची तजवीज करावी लागते. वर्षभर पुरेल इतके तिखट करताना महिलांची दमछाक होते. मात्र, यंदा मिरचीचा भाव वाढल्याने तिखटाला महागाईची फोडणी बसली आहे. एक नंबर बॅडगी मिरचीचा भाव 350 ते 400 रुपये इतका असून चवीला तिखट व लाल रंगाची बॅडगी मिरची 220 ते 250 रुपये आहे. मात्र, बेळगावात सर्रासपणे तिखटासाठी वापरल्या जाणाऱया बॅडगीचा भाव मात्र तीनशे पार झाला आहे. याशिवाय जवारी मिरची 200 ते 220 रुपये इतकी असून लवंगी मिरची 180 ते 200 रुपये किलो आहे. बेळगावात मिरची प्रामुख्याने हुबळी, रायचूर, हुडगोळ, संकेश्वर या भागातून येते. सध्या मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने मिरचीचा दर वाढला आहे. यामुळे विवाह सोहळय़ासाठी व वर्षभराचे तिखट करणाऱया नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मागील महिन्याच्या तुलनेत दर वाढतच चालले असून यामुळे गरजेनुसार दोन-तीन किलोचे तिखट करून घेण्याकडे कल वाढला आहे. संक्रांतीनंतर मिरचीचे दर कमी होण्याची शक्यता व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.