वृत्तसंस्था/ /कोपेनहॅगेन
डेन्मार्कचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा द्वितीय मानांकित पुरूष बॅडमिंटनपटू व्हिक्टर ऍक्सेलसेनला कोरोनाची बाधा झाल्याने किव्ह येथे सुरू असलेल्या युरोपियन बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेच्या रविवारी होणाऱया पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यांतून माघार घ्यावी लागली.
युरोपियन चॅमिपयन्सशीप बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेन आणि अँडर्स अँटोनसेन यांच्यात पुरूष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होती पण ऍक्सेलसेनला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि अँटोनसेनला या स्पर्धेतील विजेता म्हणून जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत ऍक्सेलसेनला टॉप सिडींग देण्यात आले होते. तसेच तो या स्पर्धेतील विद्यमान विजेताही होता. 27 वर्षीय ऍक्सेलसेनने शनिवारी या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात फिन कोलजोनेनचा उपांत्य फेरीत पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. या सामन्यापूर्वी ऍक्सेलसेन कोरोनाच्या पहिल्या चाचणीत पॉझिटिव्ह ठरला होता. ऍक्सेलसेनला आता पुढील 13 दिवसांच्या कालावधीसाठी येथील एका हॉटेलमधील खोलीत क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत त्याने कास्यपदक मिळविले होते.