हैदराबाद
कोरोना महामारीचे संकट गडद होत असताना देशभरातून मदतीचा ओघ मोठया प्रमाणात सुरु आहे. या कठीण काळात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर यांनी मदतीचा पुढाकार घेतल्यानंतर भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. गोपीचंद यांनी 11 लाख पंतप्रधान सहायता निधीसाठी तसेच तेलंगणा राज्य सरकारच्या मदतनिधीसाठी 10 लाख व आंध्र प्रदेश सरकारच्या मदतनिधीसाठी 5 लाख अशी एकूण 26 लाखांची मदत केली आहे. देशातील सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत घरीच रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. गोपीचंद यांच्या आधी पीव्ही सिंधूने तेलंगण व आंध्र प्रदेश सरकारच्या मदतनिधीला प्रत्येकी 5 लाख रुपये दिले आहेत.