ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालला कोरोनाची लागण झाली आहे. सायना बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी थायलंडला आली आहे, तिकडच्याच रुग्णालयात सायनाला क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे हा सायनासाठी मोठा धक्का आहे. कारण 12 ते 17 जानेवारीदरम्यान योनेक्स थायलंड ओपन खेळवले जाणार होते. यानंतर आता 19 ते 24 जानेवारीदरम्यान टोयोटा थायलंड ओपन आणि 27 ते 31 जानेवारीदरम्यान बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स होणार आहेत.
याआधी सायना नेहवाल बँकॉकमध्ये होणाऱ्या या स्पर्धांबाबत असलेल्या प्रतिबंधांबाबत समाधानी नव्हती. कोविड-19 बद्दलच्या प्रोटोकॉलबद्दल सायनाने नाराजी उघड केली होती. 30 वर्षांची सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आता या स्पर्धांमध्ये खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.
दरम्यान, सायना नेहवालने बँकॉकमध्ये झालेल्या तिसऱ्या कोरोना चाचणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या चाचण्या 11 जानेवारीला करण्यात आल्या.
थायलंडमध्ये सुरु असलेल्या टुर्नामेंटमध्ये सायना आणि प्रणॉय भारताचे सर्वात प्रबळ दावेदार होते. सोबतच ही स्पर्धा ऑलिंपिकच्या तयारींसाठी महत्त्वाची होती.