योग्य ठिकाणी वापर करावा : गैरवापर होत असल्याचा आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
मुख्यतः पोलीस प्रशासन बॅरिकेड्सचा वापर वाहतूक अडविण्यासाठी किंवा एकेरी वाहतुकीसाठी करते. मात्र स्मार्ट सिटीअंतर्गत तयार करण्यात आलेल्या व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांवर हे बॅरिकेड्स जागोजागी दिसू लागले आहेत. या बॅरिकेड्सचा गैरवापर सध्या होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर एका बाजूने बॅरिकेड्स उभे केलेले पहायला मिळत आहेत. नवीन रस्ते तयार करताना दोन-तीन दिवस येथून एखादे वाहन जाऊ नये किंवा पादचारी जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात काही हरकत नाही. मात्र कित्येक दिवस उलटून गेले तरी हे बॅरिकेड्स एकाच जागी पहायला मिळत आहेत.
शहरात जागोजागी असलेले बॅरिकेड्स नागरिकांसाठी अडथळा ठरत आहेत. काही बॅरिकेड्स मोडकळीसदेखील आले आहेत. त्यामुळे हे बॅरिकेड्स घेऊन जाण्यास पोलीस प्रशासन का दिरंगाई करत आहे, या बॅरिकेड्सचा वापर योग्य ठिकाणी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.