तरुण भारतच्या वृत्तची दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
बॅरिकेड्सचा विळखा ठरतोय पादचाऱयांना तापदायक या तरुण भारतच्या वृत्ताची दखल घेऊन आमदार अनिल बेनके यांनी मंगळवारी सकाळी राजेंद्रप्रसाद चौकाला भेट दिली. व पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना बोलावुन बॅरिकेड्स हटविण्यास भाग पाडले.
शहरातील रस्ते आणि वाहतुक कोंडी ही बेळगावकरांची कायमची डोकेदुखी आहे. अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र तशातच रस्ते अडवल्याने नागरिकांच्या त्रासत भर पडत आहे. मंगळवारी त्याबाबतचे वृत्त तरूण भारतने प्रसिद्ध केले. त्याची दखल घेऊन आमदार अनिल बेनके यांनी या चौकाला भेट दिली.
आमदार आल्याचे पाहताच अनेक व्यापारी व नागरिकांनी बॅरिकेड्समुळे निष्कारण त्रास होत असल्याचे सांगितले. सध्या दिवाळी जवळ आली असून, परगावचे प्रामुख्याने चंदगड भागातून नागरिक बेळगावला येत आहेत. अशावेळी रस्ते अडविल्याने त्यांची गैरसोय होत आहे. रस्त्यांची दुरावस्था व बॅरिकेड्सचा अडथळा तापदायक झाल्याने लोकांचे बेळगावला येण्याचे प्रमाण कमी होईल. कोरोनामुळे आधिच आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आता बॅरिकेड्समुळे ग्राहक खरेदीस आले नाहीत तर या संकटात भर पडणार आहे असे व्यापाऱयांनी सांगितले.
आमदार बेनके यांनी त्वरित सीपीआय कल्याणशेट्टी यांना बोलावून घेतले. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनाही बोलावून घेतले. स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे त्यामध्ये बॅरिकेड्सची भर घालू नका असे त्यांनी सांगितले आणि त्वरित बॅरिकेड्स हटविण्यास भाग पाडले. तरुण भारतने हे वृत्त प्रसिद्ध केले व त्वरित त्याची दाखल घेतली गेली त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.