500 किमीपर्यंतचे लक्ष्य अचूक गाठण्याची क्षमता – देशाच्या संरक्षण सज्जतेत भर
बालासोर / वृत्तसंस्था
ओडिशाच्या बालासोर किनाऱयावरून लघु पल्ल्याच्या‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची बुधवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 150 किमी ते 500 किमीपर्यंतचे लक्ष्य सहजपणे नष्ट करू शकते. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) याची निर्मिती केली आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे सुरक्षा दलाची ताकद वाढली आहे.
नुकतेच चाचणी करण्यात आलेले ‘प्रलय’ क्षेपणास्त्र 150 किमी ते 500 किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकते. ओडिशामधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर बुधवारी सकाळी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र एक टनापर्यंतचे वॉरहेड वाहून नेऊ शकते. भारताने हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या कमी पल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रांच्या विरोधात तयार केले आहे.
चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे भारत आपली लष्करी ताकद वाढवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर डीआरडीओकडून वारंवार विविध क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या जात आहेत. यापूर्वी भारताने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या मध्यम पल्ल्याच्या अग्नि प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. दोन हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची ओडिशातील बालासोर येथूनच चाचणी घेण्यात आली होती. हे क्षेपणास्त्रही डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला भारताने दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. 8 डिसेंबर रोजी भारताने सुखोई लढाऊ विमानातून सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या हवाई आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली होती. ओडिशातील चांदीपूर एकात्मिक चाचणी श्रेणीवरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने हे ब्रह्मोस विकासातील एक मोठे यश असल्याचे वर्णन केले आहे.
काही दिवसांपूर्वी म्हणजे 7 डिसेंबरला भारताने पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱया कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. ही हवाई संरक्षण यंत्रणा केवळ 15 किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकते. नौदलाच्या युद्धनौकांसाठी डीआरडीओने हे तयार केले आहे. या क्षेपणास्त्रामुळे नौदलाच्या युद्धनौकांसाठी हवेतून येणारा धोका हवेतच नष्ट होईल. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणाऱया जुन्या बराक-1 क्षेपणास्त्राची जागा घेईल.