क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल बांबोळीच्या ऍथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आलेला एफसी गोवा आणि बेंगलोर एफसी यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत संपला. एफसी गोवासाठी डायलन फॉक्स तर बेंगलोर एफसीसाठी कप्तान सुनील छेत्री यांनी गोल केले.
या निकालाने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. बेंगलोरचे 12 सामन्यांतून तीन विजय व प्रत्येकी पाच पराभव व बरोबरीने 14 गुण झाले. एफसी गोवाचे 13 सामन्यांतून तीन विजय व प्रत्येकी पाच पराभव व बरोबरीने समान 14 गुण झाले. गुणतालिकेत मात्र बेंगलोर अजुनही आठव्या तर एफसी गोवा नवव्या स्थानावर आहेत.
पहिल्या सत्रात एफसी गोवाने प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व ठेवण्यात यश मिळविले. सामन्याच्या 20व्या मिनिटाला बेंगलोर एफसीने पहिले धोकादायक आक्रमण केले. यावेळी रोशन नाओरामने हाणलेला फटका प्रतिस्पर्धी संघाचा बचावपटू अन्वर अलीला स्पर्श करून इमान बासाफा याच्याकडे गेला. त्याने मारलेला फटका गोलच्या आडव्या पट्टीवरून गेल्याने बेंगलोरची गोल करण्याची संधी हुकली. त्यानंतर एफसी गोवाच्या जॉर्गे ऑर्तिजच्या पासवर एदू बेडियाचा हेडर गोलमध्ये जात असताना किंचित हुकला.
एफसी गोवाने त्यानंतर कित्येक आक्रमणे बेंगलोरवर रचली. सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना एदूच्या पासवर डायलन फॉक्सचा गोल करण्याचा यत्न फसल्यानंतर दुसऱयाच मिनिटाला डायलनने केलेल्या चुकीची भरपाई करताना एफसी गोवाचा गोल केला. ऑर्तिजने शॉर्ट कॉर्नर घेऊन नॉग्वेराला चेंडू दिला. नॉग्वेराने परत चेंडू जॉर्गेला दिला. त्याने केलेल्या क्रॉसवर डायलनने हेडरवर प्रतिस्पर्धी गोलरक्षक गुरप्रीत सिंगला भेदले व चेंडूला जाळीची दिशा दाखवली. दुसऱया सत्रात बेंगलोर एफसीने सुधारीत खेळ केला. त्यांच्या रोशन नाओरेम, क्लिटोन सिल्वा तसेच कप्तान सुनील छेत्रीने चांगली आक्रमणे करून एफसी गोवाला बचावावर लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडले. लढतीच्या 61व्या मिनिटाला बेंगलोरने गोल बाद केला. प्रिन्स इबाराच्या क्रॉसवर व्यवस्थित ताबा मिळवत सुनील छेत्रीने हेडरवर गोलरक्षक धीरज सिंगला चकविले व गोल नोंदविला. त्यानंतर 69व्या मिनिटाला रोशन नाओरेमचा एक गोलमध्ये जाणारा फटका धीरज सिंगने झेपावत अडविला होता. शेवटच्या मिनिटाला तर सुनील छेत्रीने क्लिटोन सिल्वाने दिलेल्या पासवर मारलेला फटका आडव्या पट्टीला आदळल्याने बेंगलोरची विजयी गोल होण्याची संधी वाया गेली.