बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचीही कमतरता भासत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान एरोस्पेस आणि डिफेन्स प्रमुख हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) मंगळवारी बेंगळूरमधील रुग्णालयांना आणखी दोन रुग्णवाहिका दान केल्या आहेत. रुग्णवाहिका व्हिक्टोरिया हॉस्पिटल कॅम्पस स्थित नेफ्रो यूरोलॉजी (आयएनयू) आणि सर सी. व्ही. रमण जनरल हॉस्पिटल (एससीव्हीआरजीएच) यांना देण्यात आल्या आहेत.
एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. माधवन यांनी चालू असलेल्या महामारीचा विचार करता आम्ही आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी आमच्या कडून जे काही करता येईल ते करीत आहोत असे म्हंटले आहे.
संचालक (मानव संसाधन) आलोक वर्मा यांच्या माहितीनुसार रुग्णवाहिकेमध्ये वातानुकूलन, मूलभूत जीवन सहाय्य प्रणाली, ऑक्सिजन वितरण प्रणाली, फ्लोर माउंटिंग मेकॅनिझिकमसह ऑटो लोडर स्ट्रेचर ट्रॉली, स्वतंत्र डॉक्टरांचे आसन इत्यादी सुविधा आहेत.
यापूर्वी एचएएलने पीएसयूच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम अंतर्गत बाऊरिंग अँड लेडी कर्झन मेडिकल कॉलेज व रिसर्च इन्स्टिट्यूट (बीएलसीएमसी अँड आरआय) यांना दोन रुग्णवाहिका दान दिल्या आहेत.