बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्ण वाढ सुरूच आहे. दरम्यान राजधानी बेंगळूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बेंगळूरमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढलेला पाहायला मिळाला. १ ऑक्टोबरपासून शहरात जवळपास ६० हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दोन आठवड्यात तीन वेळा शहरात एका दिवसात ५ हजाराहून अधिक रुग्ण आढळलेत. दरम्यान देशाची राजधानी दिल्लीने कधीही साडेचार हजारांचा टप्पा ओलांडलेला नाही. कर्नाटकात बेंगळूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
बेंगळूरमध्ये शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखाच्यावर गेली आहे. गुरुवारी, जवळजवळ ३८०० कोरोना रुग्णांची नेंद झाली आहे. तर एक दिवस आधी शहरात ४५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी ३७८८ रुग्णांची भर पडली तर ३,५२० रुग्ण घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ३,४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.