आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती : आजपासून उपचाराला होणार सुरुवात
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाबाधित रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण होण्याचा धोका वाढला आहे. राज्यातील काही जिल्हय़ांत असे रुग्ण आढळले आहेत. अशा रुग्णांवर बेंगळूरच्या बौरिंग इस्पितळात उपचार देण्यासाठी प्राथमिक टप्प्यात व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. येथे पत्रकारांशी ते
बोलत होते.
डॉ. के. सुधाकर पुढे म्हणाले, रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे, स्टेरॉईडचा अधिक वापर करणारे तसेच मधुमेह असणाऱया रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर ब्लॅक फंगस होण्याचा धोका असतो. नाकापासून सुरू होणारा हा फंगस नंतर डोळय़ांना हानी पोहोचवतो. यामुळे दृष्टी गमावण्याची शक्मयताही अधिक असते. महाराष्ट्रात असे रुग्ण आढळल्यानंतर आपण येथील नेत्रतज्ञांशी चर्चा केली आहे. सोमवारपासूनच बौरिंग इस्पितळात अशा रुग्णांवर योग्यप्रकारे उपचार करण्यास प्रारंभ होईल. त्यानंतर सर्व जिल्हा इस्पितळे आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही व्यवस्था करण्यात येणार आहे. याकरिता नेत्रतज्ञांसह 3 ते 4 तज्ञांचा समावेश असणारी समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती ब्लॅक फंगस असणाऱया रुग्णांवर कोणत्या प्रकारे उपचार करावेत, याबाबत सल्ला देणार आहे.
20 हजार डोसची केंद्राकडे मागणी
ब्लॅक फंगसवर सलग 7 आठवडे उपचार करावे लागणार असून यासाठी 3 ते 4 लाख रुपये खर्च होतात. हा उपचार मोफत देण्याकरिता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांसाठी आवश्यक असणारे औषध केंद्र सरकार देणार असून 20,000 डोसचा पुरवठा करण्याची विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री डॉ. सुधाकर यांनी दिली.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना माहिती देणार…
कोणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईड व इतर संबंधित औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांनी देखील लोकांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे अनावश्यकपणे देऊ नयेत. बेंगळूर वगळता इतर जिल्हय़ांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दर कमी झालेला नाही. याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांना माहिती देण्यात येणार आहे, असे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.